
सामना प्रतिनिधी। रत्नागिरी
जनतेमध्ये जनजागृत्ती करण्यासाठी परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व सीएसआर डेअरी यांच्या संयुक्त विद्यमाने महा वॉकेथॉन 2018 रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर महा वॉकेथॉन रॅलीचे उद्घाटन मुख्य प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश . आर. एन. जोशी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, रत्नागिरी येथे करण्यात आले. रॅलीचे समारोप जलतरण तलाव, साळवी स्टॉप येथे झाले. याप्रसंगी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण बोलत होते.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जे.डी. कुलकर्णी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक निवोदकुमार दिवटे व अनेक मान्यंवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले जिल्ह्यामध्ये अंदाजे 3 लाख 50 हजार वाहने असून गेल्या आठ महिन्यात अंदाजे 150 मृत्यु अपघातामुळे झाले आहे आहेत, ही एक मानव निर्मित आपत्ती आहे. रस्त्यांवरील अपघात कमी होण्यासाठी रस्त्यांच्या लेन वाढविण्याबरोबर विचारशक्तीमधील लेन, विचारधारा वाढणे गरजेच आहे.
तसेच आजचे विद्यार्थी हे उद्याचे नागरिक आहेत त्यामुळे रस्ते सुरक्षा संदर्भात त्यांच्यात जनजागृत्ती होण्यासाठी शाळेमध्ये रस्ते सुरक्षा, वाहतूक चिन्हे, नियम बाबत प्रशिक्षण देणं आणि त्याबाबत विद्यार्थींची परिक्षा घेणे हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच आपली रेल्वे, एसटी इ. सारखी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही जर प्रबल, बळकट केली तर रस्त्यावरील वैयक्तिक वाहनांचे प्रमाण कमी होऊन रस्त्यांवर होणारे अपघाताच्या प्रमाणात घट होईल. छोट्या छोटया अंतरासाठी आपण चालणे तसेच सायकलचा वापर करणे गरजेच असल्याच सांगून ते म्हणाले यामुळे इंधन बचत होईल तसेच आपले आरोग्यही व्यवस्थित राहील. महा वॉकेथॉन च्या माध्यमातून आजची चालण्याची सवय आपण आरोग्याच्या दृष्टिने पुढे कायम सुरु ठेवाल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी म्हणाले जिल्हयात मुबई-गोवा महामार्ग, रत्नागिरी ते नागपूर, गुहागर -चिपळूण-कराड रस्त्यांचे काम सुरु असून त्यामुळे कनेक्टिव्हीटी वाढणार आहे.रत्नागिरी हा पर्यटनासाठी पुरक असा जिल्हा असून कनेक्टिव्हीटी वाढण्याने पर्यटनातही वाढ होणार आहे. पंरतु जिल्हयात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांसाठी जास्त पर्यटन स्थळही उपलब्ध करुन देणे गरजेच आहे जेणेकरुन येथे आलेले पर्यटक जास्त दिवस राहील आणि पर्यटनातून येथील नागरिकांच्या उत्पन्नात वाढ होईल. ते पुढे म्हणाले रस्ता सुरक्षा, पर्यटनात वाढ करणे, रस्त्यावरील अपघात कमी करणे, स्वच्छता ठेवणे यासाठी आपण सर्वांनी स्वत:पासून सुरुवात करुया असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.यावेळी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, एसटी कर्मचारी, पोलीस कर्मचारी, वाहतूक संघटना, रिक्षा संघटना, ड्रायव्हींग प्रशिक्षण संस्थांचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
































































