रत्नागिरी जिल्ह्यात मासेमारीसाठी दुसऱ्या क्रमांकाचे बंदर ओळख असलेल्या हर्णे बंदर गावात कायमच वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने हर्णे मार्गाचे अधिक महत्त्व आहे. मात्र या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहनधारकांचे चांगलेच कंबरडे मोडत आहे.
हर्णे गावात दापोलीकडे जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्ता वाहतुकीसाठी योग्य राहिलेला नाही. मात्र या मार्गाला दुसरा पर्यायी मार्ग नसल्याने नाईलाजास्तव प्रवासी तसेच अवजड वाहतूक करावी लागत आहे. मात्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला मात्र या महत्त्वाच्या रस्त्यांची सुधारणा करण्याचा विसर पडला आहे.
दापोली तालुक्यातील हर्णे हे गाव अतिशय महत्त्वाचे असे गाव आहे. या गावातील बंदरात चालणारा मासे लिलावाचा व्यवसाय असेल अथवा पाण्यातील सुवर्णदुर्ग किल्ला, फत्तेगड गोवा तसेच कनकदुर्ग या ऐतिहासिक वारसा असलेल्या किल्ल्यांमुळे पर्यटकांचा ओघ येथे वाढला आहे.
या मार्गावर प्रामुख्याने अवजड वाहनांची होणारी वाहतूक असेल वा प्रवासी वाहतूक तसेच पर्यटकांची येणारी वाहने पाहता या येथील रस्ते सुस्थितीत असायला पाहिजे. मात्र रस्त्यांची अवस्था पाहता रस्त्यावर खड्डा की खड्ड्यात रस्ता हे कळत नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाने इकडे कानाडोळा केल्याने खड्डे तुडवत रोजचे मार्गक्रमण करावे लागत आहे.