
अज्ञात कारणातून कोयत्याने हल्ला करत तरुणाची हत्या केल्याची घटना रत्नागिरीतील कुवारबाव साईनगर येथे घडली. सूरज राजाराम झोरे (25) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसात हत्येची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. सोहम एकनाथ म्हात्रे, अभिषेक देवानंद राठोड,नजीबूल शेख उर्फ सोनू अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
सूरजच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, सूरज हा गुरुवारी कामानिमित्त रत्नागिरीत आला होता. यावेळी संशयित आरोपींनी गुरुवारी रात्री अज्ञात कारणातून सात बंगल्याच्या मागे सूरजवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सूरजवर जिल्हा शासकिय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी सूरजचा मृत्यू झाला.
सूरजची बहिण नंदा झोरे हिने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करत संशयित आरोपींना ताब्यात घेतले. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सतीश शिंदे करत आहेत.



























































