
रत्नागिरी शहराजवळील मिरजोळे-एमआयडीसी परिसरात वेल्डींगचे काम करताना अचानक तोल जावून पडल्याने एक तरुण कामगार गंभीर जखमी झाला. उंचावरुन पडताना बाजूने जाणाऱ्या उच्च दाब वीज वाहिनीचा त्याला धक्का लागला. सुरक्षा तारांमध्ये अडकल्याने हा तरुण गंभीर भाजला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे या तरुणाला वेळत रुग्णालयात दाखल करण्यात आले. असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रोशन रामचंद्र घवाळी (वय 31, रा. पानवल घवाळीवाडी, रत्नागिरी) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. 20) दुपारी तीनच्या सुमारास एमआयडीसी येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिरजोळे एमआयडीसी येथील प्लॉट नंबर पी-24 मधील घरमालक अब्दूल रहमान अन्सारी यांच्या घराजवळ वेल्डिंगचे काम सुरू होते. या ठिकाणी रोशन घवाळी हा कामगार पत्रे लावण्याच्या कामासाठी उंचावर चढला होता. काम करताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो थेट खाली कोसळला. दुर्दैवाने, ज्या ठिकाणी तो पडला तिथेच एफसीआय गोडाऊनच्या भिंतीपलीकडून महावितरणची एक्सटेन्शन वीज वाहिनी जाते. खाली पडत असताना रोशन या हायव्होल्टेज वीज वाहिनीला स्पर्श करुन खाली पडला. ज्यामुळे त्याला विजेचा धक्का लागला. वीज वाहिनीवरुन थेट खाली पडताना कंपाऊंडला सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या काटेरी तारांच्या कुंपणात तो अडकला वीज वाहिनीचा तीव्र शॉक लागल्यामुळे त्याच्या पाठीला व तारांमध्ये अडकल्याने पायाला दुखापत झाली. या दुहेरी अपघातात तो अत्यंत गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच मिरजोळे- एमआयडीसी अग्नीशमन दलाचे जवान एका क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.





























































