रत्नागिरीत मुसळधार पाऊस, निवळी येथे दरड कोसळली; मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज दिवसभर मुसळधार पावसाने रत्नागिरीला झोडपून काढले.दिवसभर ढगाळ वातावरण,संततधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर निवळी येथे दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली.

मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी येथे दरड कोसळली आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दरड हटवण्याचे कामही सध्या युध्दपातळीवर सुरू आहे. दरम्यान मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना प्रवासात मोठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी येथे दरड कोसळल्याची घटना घडली आहे. संबंधित यंत्रणेकडून दरड बाजूला करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

शनिवारी सायंकाळपासून ढगाळ वातावरणासह पावसाने हजेरी लावली.आज रविवारी सुर्यनारायणाचे दर्शनच झाले नाही.दिवसभर संततधार पाऊस कोसळत होता.अनेक ठिकाणी पाणी साचून वाहतूकीला अडथळा झाला.थिबा पॅलेस येथे एका घराचे छप्पर कोसळले.किल्ला येथे हनुमानवाडीत दरड कोसळली. दिवसभर वीजेचाही लपंडाव सुरू होता.