रत्नागिरी – राजापूरची चप्पल निघाली लंडनला, सोशल मीडियाची कमाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मिडियाच्या या दुनियेत राजापूरातील चप्पलने लंडन गाठले आहे. कोल्हापुरी चप्पल बनवण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि या युवकाला थेट लंडन येथून चप्पलेची मागणी आली आणि रत्नागिरीतील आडिवरे (ता. राजापूर) या ग्रामीण भागात तयार झालेली ही चप्पल थेट लंडनला पोहचली.

आडिवरे गावातील सुनील सूर्यकांत आडिवरेकर या तरुणाने तयार केलेली ही चप्पल सातासमुद्रापार पोहचली. आडिवरे येथे सुनीलचे वडील सूर्यकांत आडिवरेकर यांचे छोटेसे दुकान आहे. वडिलांसोबत दुकानात येता येता चप्पल तयार करण्याची कला त्याला आकर्षित करू लागली. त्यानंतर वयाच्या दहाव्या वर्षी त्याने वडिलांबरोबर व्यवसायाला सुरुवात केली.

गाव छोटेसे असल्याने गावात राहून आपल्या कलेचे चीज होणार नाही, असे मनात ठरवून त्याने मुंबई गाठली. मुंबईत आपले बस्तान बसवीत असतानाच वयाच्या 25 व्या वर्षी वडिलांचे अकाली निधन झाले.

सुनील आडिवरेकर याने कोल्हापूरी चप्पल तयार करण्यास सुरुवात केली. त्याने बनविलेली पहिली चप्पल मुंबईतील वरळी भागात गेली आहे. त्याचवेळी सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ अपलोड झाला आणि हा व्हिडीओ पाहून दिल्लीतून पहिली ऑर्डर आली. त्यानंतर हैदराबाद याठिकाणी त्याने चप्पल पाठविली.

सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून लंडन येथील रतन जयस्वाल नावाच्या व्यक्तीने सुनीलशी संपर्क साधून चप्पलची मागणी केली. त्याने आडिवरे येथून ही चप्पल मुंबईतील अंधेरी येथे पाठविली असून, तेथून ती लंडनच्या दिशेने रवाना झाली आहे.