
दुर्गेश आखाडे । रत्नागिरी
राज्य नाट्य स्पर्धेतील पहिली दोन नाट्यपुष्प गंभीर विषयावर बेतलेली होती. मात्र गुहागरच्या कलाविकास रंगभूमीने गुंफलेल्या तिसऱ्या नाट्यपुष्पाने हस्याचे फवारे उडवले.जयवंत दळवींच्या ‘सभ्य गृहस्थ हो’ यानाटकाने धम्माल केली.
‘सभ्य गृहस्थ हो’ ही एका चाळीत रहाणाऱ्या पांढरपेशी नोकरदार वर्गाची कहाणी आहे.पन्नासशी ओलांडली,शरीर थकलं तरी मनातलं तारूण्य कसं चुळबूळ करतं हे त्या चाळीत चंद्रिका नावाची स्त्री रहायला आल्यावर दिसतं.हलक्या फुलक्या विनोदांनी नाट्यरसिकांना मनमुराद हसविणाऱ्या यानाटकाचे दिग्दर्शन उदय सावरकर यांनी सांभाळताना विनोदाचा दर्जा कुठे घसरू दिला नाही.कारण विनोदाला समयसुचकता,देहबोली या दोन्ही गोष्टींचा समतोल सांभाळावा लागतो.विनोदी नाटक करणे तसे कठीण कारण नाटकाच्या विनोदावर प्रेक्षक हसले पाहिजेत नाटकावर नाहीत.विनोदी नाटकात अतिरेक केला त्याला उथळपणा येतो किंवा पांचटगिरी वाटते.’सभ्य गृहस्थ हो’ हे नाटक करत असताना विनोदातला सभ्यपणा कलाकारांनी राखला म्हणून हे नाटक प्रेक्षकांना आवडले.लिमये गुरूजींच्या भूमिकेत कृपाल परचुरे अधिक सरस ठरले.
चंद्रिकेच्या एकतर्फी प्रेमातला वेडेपणा आणि बायकोला घाबरून चंद्रिकेला चोरून पहाण्याची त्यांची धडपड प्रेक्षागृहात हशा पिकवत होती.चंद्रिकेवर ‘लाईन’ मारणारे चाळीतील आणखी एक व्यक्तीमत्व गजाभाऊ गोखले.गजाभाऊ गोखलेंची भूमिका करणाऱ्या डॉ.मंदार आठवले यांना विनोदाची पूर्ण जाण होती.
लेखकाच्या विनोदाला आपल्या हावभावातून ते अधिकपणे प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्याचे काम डॉ.मंदार आठवले यांनी केलं. चंद्रिकेला पटविण्यासाठी गोखले आणि लिमये यांच्यातील जुगलबंदीत भर पडते ती डॉ.मुसळे आणि जोशी मास्तरांची.इथूनच पुढे धम्माल सुरू होते.चौघा सभ्य गृहस्थांच्या प्रेमाला अंकुर फोडण्याचे काम खोडकर गोपीनाथ गोखले करतो.सुरवातीला चंद्रिकेचा आंबाडा आणि नंतर प्रेमपत्र नाटकात धम्माल उडवून देतात.जोशी मास्तराच्या भूमिकेला प्रकाश तांबे यांनी न्याय देताना चंद्रिकावरच्या प्रेमाच्या धडपडीत कुठे कमतरता दाखवली नाही.व्याकरणावर प्रेम करणारा आणि जोशी म्हटलं की मास्तरच असं एेकताच अहंकार दुखावलेला जोशी मास्तर भाव खाऊन गेला.तीन वयस्करांमध्ये तरण्याबांड डॉ.मुसळेची भूमिका करणाऱ्या चिन्मय सावरकर यांनेही चंद्रिकेचा प्रेमवडा साकारताना काहीतरी थ्रिल करू पहाणारा विवाहित तरूणाची भूमिका चोख बजावली.गोदूताई साकारणाऱ्या सावनी परचुरे यांनी नवऱ्याला काबूत ठेवणारी स्त्री विनोदी ढंगाने साकरताना स्वताच्या अभिनयाचा ठसा उमटवला.सरलाबाईच्या भूमिकेत श्रद्धा जोशी यांनीही भूमिकेला न्याय दिला.गडबड झाली ती घरमालकाच्या घरातील प्रसंगात.याप्रवेशाकडे दिग्दर्शकाने थोडं लक्ष द्यायला हवं होतं.याप्रवेशात चारही पात्र बहरत असताना मालकाच्या भूमिकेत विश्वास सोमण गडबडले.या प्रवेशात पाचही पात्रांची भट्टी जमली असती तर मग पुढे प्रेक्षागृहात हास्यस्फोटच झाले असते.याप्रवेशातला चहाचा प्रसंग विनोदाची उंची सांगणारा आहे.’बोल राधा बोल’ गीतावर चारही कलाकारानी भन्नाट नृत्य केलं.चौघांचा प्रेमवेडा पाहून प्रेक्षकांचीही चंद्रिकेला पहाण्याची उत्सुकता वाढते.ती उत्सुकता इतका ताणली की शेवटच्या प्रसंगात चंद्रिका ‘बाय-बाय’ करायलाच येते.दिपाली परचुरे,निनाद सहस्त्रबुध्दे आणि महेश आठवले यांनी आपल्या भूमिका चोख बजावल्या.केदार परचुरे यांचे नेपथ्य अप्रतिम होते.त्यांनी डोळ्यापुढे चाळ उभी केली.चाळीतल्या गॅलरीत कलाकारांना वावरायला फारशी जागा नसली तरी अभिनयाने सर्वच जागा भरून काढल्या.


























































