शीळ धरणातील जॅकवेल कोसळली, रत्नागिरी शहरावर ऐन गणेशोत्सवात पाणी संकट

रत्नागिरी शहरासमोर पाण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. रत्नागिरीला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणातील जॅकवेल कोसळली आहे. जॅकवेल कोसळताना आतील कामगारांनी बाहेर उड्या मारून आपले प्राण वाचवले. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

बुधवारी रात्री शीळ धरणाची ही जॅकवेल कोसळली. याची माहिती मिळताच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ऐन गणेशोत्सवात ही घटना घडल्याने रत्नागिरी शहरावर पाणी संकट कोसळले आहे. जॅकवेल एकाच बाजूला कलंडली असून ही घटना घडली तेव्हा जॅकवेलमध्ये दोन कामगार होते. जॅकवेल पडत असताना ते जखमी झाले. मात्र प्रसंगावधान राखून त्यांनी जॅकवेल मधून उड्या मारल्याने ते दोघे बचावले. सध्या नवीन जॅकवेल बांधून पूर्ण आहे, मात्र ती सुरू करण्यासाठी 10 ते 15 दिवसांचा कालावधी लागेल. तोपर्यंत एमआयडीसीकडून शहराला पाणी पुरवठा केला जाणार आहे.

युध्दपातळीवर काम सुरू

जुन्या जॅकवेलमधील पंप आणि पॅनेल हे महागडे आहे, मात्र धोका पत्करून आम्ही ते सामान बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत. एमआयडीसी कडून पाणी घेण्यासाठी पाईप जोडण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी कोल्हापूरहून सामान मागविले आहे. आज रात्री दहा वाजेपर्यंत गाडी रत्नागिरीत पोहचेल त्यानंतर तात्काळ काम सुरू होईल. दरम्यान पानवल धरणातून शहरात पाणी पुरवठा सुरू करण्यात आला असल्याची माहिती रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी दिली.

ऐन गणेशोत्सवात पाण्याची बोंब

ऐन गणेशोत्सवात पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. सणासुदीच्या दिवसात रखडलेली नळपाणी योजना आणि रखडलेल्या कामाचा मनस्ताप नागरिकांना भोगावा लागत आहे. वेळीच नवीन जॅकवेलचे काम पूर्ण झाले असते तर हे संकट टळले असते. आज दुपारनंतर शहरातील काही भागात पानवल धरणातून पाणीपुरवठा करण्यात आला. उद्या शहरातील काही भागात पानवल धरणातून पाणी पुरवठा होणार आहे.

दुर्घटनेला राज्यातील सत्ताधारी जबाबदार

शीळ धरणातील जॅकवेल कोसळल्याने आज रत्नागिरी शहरातील पाणीपुरवठा ठप्प झाला या दुर्घटनेला सत्ताधारी पक्ष जबाबदार आहे असा आरोप शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी जिल्हा समन्वयक संजय पुनसकर यांनी केला आहे.संजय पुनसकर म्हणाले की, शीळ धरणातील यादुर्घटनेला राज्यातील सत्ताधारी आणि नगर परिषदेचा भोंगळ कारभार जबाबदार आहे. 1196 साली बांधलेल्या या जॅकवेलची परिस्थिती काय आहे? ती किती दिवस टिकेल? याचा अंदाज नगरपरिषदेला असायला हवा होता. तसेच नवीन नळपाणी योजनेतील जॅकवेल वेळेत बांधून पुर्ण असायला हवी होती मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच हि घटना घडली आणि रत्नागिरीवर पाण्याचे संकट कोसळले आहे.त्या जॅकवेल मध्ये दोन कामगार होते ते जखमी झाले जर त्यांचे बरेवाईट झाले तर त्याला जबाबदार कोण असते? असा सवाल संजय पुनसकर यांनी उपस्थित केला.

…तर नगरपरिषदेवर मोर्चा काढणार

जे काम अगोदर करायचे होते ते जॅकवेलचे काम अगोदर केले नाही. तुम्ही जिथून पाणी उचलणार आहात ते जॅकवेलचे काम आधी व्हायला हवे होते मग पाईपलाईन टाकायला हवी होती.मात्र नगरपरिषदेचा हा सर्व अनागोंदी आणि भ्रष्टाचारी कारभार आहे असा आरोप करताना 15 दिवसात नवीन जॅकवेल सुरू न झाल्यास कॉंग्रेस नगर परिषदेवर मोर्चा काढेल असा इशारा कॉंग्रेसचे रत्नागिरी शहराध्यक्ष रमेश शाहा यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.