
अदानींची एंट्री होताच एनडीटीव्ही या आघाडीच्या वृत्तवाहिनीत मोठी उलथापालथ सुरू असून आता कार्यकारी संपादक रवीश कुमार यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
एनडीटीव्हीचे प्रवर्तक प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी मंगळवारी वाहिनीच्या संचालक मंडळातून राजीनामा दिला होता. त्यानंतर आज रवीश कुमार यांनी राजीनामा दिला आहे. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीत रवीश कुमार यांचे हम लोग, रवीश की रिपोर्ट, देश की बात आणि प्राईम टाईम हे कार्यक्रम लोकप्रिय झाले. रवीश कुमार यांना त्यांच्या पत्रकारितेतील योगदानासाठी दोनवेळा रामनाथ गोयंका या पत्रकारितेतील मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 2019 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्काराने देखील त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
दरम्यान, एनडीटीव्हीची प्रवर्तक कंपनी असलेल्या आरआरपीआर होल्डिंगमध्ये अदानी समुहाचे 29.18 टक्के शेअर्स आहेत. गौतम अदानी यांनी 23 ऑगस्टला यासंदर्भात घोषणा केली होती. तर, 26 टक्के शेअर्स पब्लिक ऑफर्सद्वारे खरेदीची घोषणा केलेली. प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांच्याकडे 32 टक्के शेअर्स आहेत.