
सामना ऑनलाईन, मुंबई
केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेत सध्या सुरू असलेला वाद आणखी चिघळल्यास रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल हे राजीनामा देण्याची शक्यता आहे, असे वृत्त ‘मनीलाइफ’ या ऑनलाइन वित्तीय प्रकाशनाने दिले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बोर्डाची बैठक 19 नोव्हेंबर रोजी होत आहे. ही बोर्डाची बैठक वादळी होण्याची शक्यता आहे. या बैठकीतच पटेल आपला राजीनामा फेकतील आणि बँकेबाहेर पडतील, असे सांगण्यात येते.
माझ्या आरोग्यावर वादाचा परिणाम
केंद्र सरकारशी सुरू असलेल्या वादाचा आपल्याला उबग आलेला असून या वादाचा जास्त ताण माझ्या आरोग्यावर पडत आहे, अशी उद्विग्नता ऊर्जित पटेल यांनी व्यक्त केली आहे, असे त्यांच्या जवळच्या सूत्रांचा हवाला देऊन वृत्तात स्पष्ट केले आहे. ऊर्जित पटेल यांच्या राजीनाम्याचे संकट उद्भवण्याचा धोका असला तरी सरकार आपल्या मागण्यांबाबत आग्रही राहण्याची शक्यता आहे. आमच्या मागण्या मान्य करण्यास रिझर्व्ह बँकेने नकार दिल्याने आम्ही निराश झालो आहोत, असे केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी म्हटल्याचे ‘रॉयटर्स’चे वृत्त आहे.































































