अवकाशात उडती तबकडी, महाराष्ट्रभर अफवांचे पीक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील अनेक भागांत आकाशातून उत्तरेकडून पूर्वेच्या दिशेने रहस्यमय वस्तू चमकत जाताना, खाली खाली येताना दिसली. त्यातून निघणारा रंगीबेरंगी प्रकाश आणि त्याची पृथ्वीच्या दिशेने उतरती दिशा पाहून अनेकांना या उडत्या तबकडय़ाच आहेत असे वाटले. परंतु, या उडत्या तबकडय़ा नसून रॉकेट लाँचर बूस्टर असल्याचे एमजीएम विज्ञान पेंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील अनेक शहरात, विशेषतः ग्रामीण भागात रात्री आठ वाजेच्या सुमारास आकाशात वेगाने रंगीबेरंगी धुमकेतूसदृश वस्तू उत्तरेकडून पूर्वेकडे जात असताना दिसून आली. या वस्तूला लांबुळकी शेपूटही असल्याचे दिसून येत होते. आकाशात जवळपास 35 ते 40 किलोमीटर उंचीवरून ही वस्तू वेगाने जात होती. तिची दिशा जशी उत्तरेकडून पूर्वेकडे असली तरी वरून ती खाली वेगाने उतरत होती. जशी जशी ही रहस्यमय वस्तू खाली उतरत असताना ती एकच वस्तू नसून तीन चार आहेत असेही दिसून येत होते. त्यातील विविध रंग अतिशय चमकदार असल्यामुळे ही वस्तू धुमकेतूही नाही आणि उल्काही नाहीत हे स्पष्टच होते. त्यामुळे ही वस्तू म्हणजे उडत्या तबकडय़ाच आहेत असे लोकांना वाटू लागले.

ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात अफवांचे पीक आल्यामुळे या संदर्भात एमजीएमच्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान पेंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, न्यूझीलंड येथील माहिया द्वीपकल्पावरून हिंदुस्थानी वेळेनुसार सायंकाळी 6ः11 वाजता तेथील रॉकेट लॅब कंपनीच्या इलेक्ट्रॉन रॉकेटद्वारे ब्लॅकस्काय नावाचा उपग्रह पृथ्वीच्या 430 किमी उंचीवर नेऊन स्थिरावण्यात आला.