
सामना प्रतिनिधी । मुंबई
पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात कोकण कृषी विद्यापीठाच्या बसला झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी सहा लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली असून मृतांच्या नातेवाईकांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्याबाबत कोकण कृषी विद्यापाठाकडून कृषी विभागाला प्रस्ताव सादर झाला असून त्यावर पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
शिवसेना आमदार संजय पोतनीस, सुनील शिंदे, प्रकाश फातर्पेकर, सुनील प्रभू आदींनी या अपघाताबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. आंबेनळी घाटात दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठातील कर्मचाऱयांना घेऊन जाणारी बस 600 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 33 कर्मचारी ठार झाले होते. याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तर दिले. कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली असून अपघाताच्या घटनेची चौकशी सुरू आहे. अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान सहाय्यता निधीतून प्रत्येक दोन लाख व मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी चार लाखांची मदत देण्यात आली. याव्यतिरिक्त मृत कर्मचाऱयांच्या पात्र कुटुंबीयांना खास बाब म्हणून गट ‘क’, गट ‘ड’ मधील रिक्त पदांवर अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचा प्रस्ताव कोकण कृषी विद्यापीठाकडून राज्य सरकारला मिळाला आहे, अशी माहिती दिली.

























































