श्री शंकरगाथा : ईश्वर-अल्ला तेरो नाम!!!

614

श्रीशंकर महाराजांचे भक्त व मुंबई येथे राहणारे नूरीसाहेब नावाचे गृहस्थ, पुणे शहरात राहणाऱया त्यांच्या खानसाहेब नावाच्या मित्राला आपल्यासोबत श्रीमहाराजांच्या दर्शनास घेऊन आले. हे खानसाहेब मानसिक अशांतीने ग्रासलेले होते. त्यांचे मन सतत अस्वस्थ राहात असे, त्यांच्या मनाला कसली ना कसली रुखरुख कायम सतावीत असे. खानसाहेब समोर येताच श्रीमहाराज त्यांना म्हणाले, ‘अरे खान, तू खरोखरीच मुसलमान आहेस का? तू नमाज तरी नीटपणे वाचतोस का? तुझा कुणी गुरू आहे का?’ श्रीमहाराजांनी केलेल्या या प्रश्नांच्या अवचित भडिमाराने खानसाहेब गोंधळले, त्यांना श्रीमहाराजांच्या प्रश्नांचे उत्तर काय आणि कसे द्यावे हेच समजेना.

खानसाहेबांच्या मनाचा गोंधळ उडालेला आहे हे लक्षात घेत श्रीमहाराजांनी त्यांना नित्यपठणातील नमाजामागचे महत्त्व सांगितले तसेच ‘नमाज’ पठणातील अनेक बारकावे उदाहरणांसहित अतिशय खुबीने समजावले. नित्यनेमाने कुराण पढणाऱया आपल्यासारख्या मुस्लीम व्यक्तीलाही जे आजवर समजले नाही त्याविषयी मार्गदर्शन करून शिवाय नमाजामध्ये असलेल्या परंतु आपणांस आजवर न गवसलेल्या अशा काही नव्या गोष्टीदेखील श्रीमहाराजांनी लक्षात आणून दिल्या आणि समजावल्या याची जाणीव होताच खानसाहेब भारावले.

खानसाहेबांनी श्रीशंकर महाराजांना मनोमन आपले गुरू मानले. पुढे श्रीमहाराज त्यांना म्हणाले, ‘नमाजी’ म्हणजे न माजणारा. अल्लाशी एकरूप होणारा तोच खरा ‘नमाजी’. जो कुठल्याही परिस्थितीमध्ये माज करीत नाही, ज्याचा अहंकार कायम ‘अल्ला’शी एकरूप झालेला आहे त्याला ‘नमाजी’ म्हणावे. तोच खरा ‘इस्लामी’ आहे हे समजावे. ‘इस्लाम’ म्हणजे शांती. महंमद पैगंबरांना अभिप्रेत असलेल्या खऱया ‘इस्लाम’ धर्माविषयी सांगताना श्रीमहाराज म्हणाले, ‘हा धर्म शांतीचा मार्ग दाखवतो, कुणाला विनाकारण मारू नका, कुणाचे काही चोरू नका, कुणाजवळचे काही लुबाडू नका. सत्यधर्माचा स्वीकार करा, स्वच्छ आणि पवित्र हृदय हीच खरी ‘मशीद’ आहे, हेच ‘प्रार्थनास्थळ’ आहे, येथे वास्तव्य करणाऱया परमेश्वराविषयी मनांत अपार श्रद्धाभाव बाळगा. प्रेम म्हणजे परमेश्वर. खरा ‘इस्लाम’ धर्म प्रत्येक मुस्लिमांस धैर्य, सहिष्णुता, श्रद्धाभाव, सद्गुण यांचा संचय करण्यास सांगतो.’ असे सांगत श्रीमहाराजांनी खानसाहेबांना मार्गदर्शन केले.
श्रीशंकर महाराज सहजसंचारी होते. त्यांचा मुक्काम कुठे आणि नेमका किती दिवसांसाठी असेल याविषयी कुणीही छातीठोकपणे सांगू शकत नसे. कुण्या भक्ताकडे महिनोन्महिने राहावे अन्यथा दुसऱया कुण्या भक्ताकडे गेल्यास जेमतेम काही काळ बसणे होताच निघण्यासाठी घाई घाई करावी असे श्रीमहाराजांचे विक्षिप्त वर्तन दिसून येत असे. श्रीमहाराज एकदा हैदराबाद येथे श्रीनिरंजन महाराजांच्या पुण्यतिथीस गेले, शिवाय पुढे एकदा बेळगावनजीक बाळेकुंद्री गावामध्ये श्रीपंत महाराजांच्या स्मृतीदर्शनासाठीही गेले.

पुणे शहरापासून जवळ असलेल्या ‘भोर’ संस्थानामध्ये श्रीमहाराज श्रीरामजन्मोत्सवासाठी गेले तेव्हाचा हा प्रसंग आहे. उत्सवाच्या निमित्ताने श्रीरामरायाच्या दर्शनार्थ भक्तांची तोबा गर्दी उसळली होती. सर्वत्र श्रीरामनामाचा जयघोष कानी पडत होता. श्रीरामजन्माची वेळ जसजशी जवळ येत होती तसतशी लोकांच्या मनातील उत्कंठा चढत्या क्रमाने वाढू लागली. श्रीमहाराज मात्र शांत आणि निवांत होते.

श्रीरामजन्मोत्सवासाठी उपस्थित असलेल्या भाविकांचे लक्ष श्रीरामरायासोबतच श्रीमहाराजांच्या हालचालीकडेही खिळून राहिले होते. प्रभू श्रीरामचंद्राच्या जन्ममुहूर्ताची वेळ समीप आली. घटिका भरली. ताशा-वाजंत्र्यांचा एकच कडकडाट झाला. नौबती झडू लागल्या. ‘भोर’ संस्थानच्या इतमामाप्रमाणे सर्वकाही ठरल्यावेळी ठरल्याप्रमाणे संपन्न झाले. इतक्यात कुणाला काहीही समजणार नाही अशा वेगाने श्रीमहाराज बसल्याजागी अदृश्य झाले आणि निमिषार्धात श्रीमहाराजांठायी घनसावळ्या श्रीरामरायाची साक्षात सजीव मूर्ती प्रकट झाली. उपस्थितांना श्रीरामदर्शन लाभले. सर्व भक्तांना हा अवचित ‘पुण्य’योग प्राप्त होताच श्रीमहाराज पुन्हा त्यांच्या मूळ रूपात प्रकटले.

आपली प्रतिक्रिया द्या