तब्बल 12 वर्षांनी फ्लोरा ‘फाऊंटन’ सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फ्लोरा फाऊंटनच्या अवतीभवती बसून या कारंजाचा अनुभव घेण्यास मुंबईकर सज्ज

सामना ऑनलाईन, मुंबई

हुतात्मा चौकातील पुरातन असे फ्लोरा फाऊंटन आज तब्बल 12 वर्षांनी पुन्हा एकदा ओसंडून वाहू लागले. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून सुरू असलेले फ्लोरा फाऊंटनच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून आज युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर हेमांगी वरळीकर उपस्थित होते.

Photo :मुंबईची शान ‘फ्लोरा फाउंटेन’चे लोकार्पण, पर्यटकांची गर्दी

गेल्या अडीच वर्षांपासून दुरुस्तीच्या कारणास्तव पडदानशीन असलेल्या फ्लोरा फाऊंटनचे आज आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यांनी विजेची कळ दाबताच तीन लेअरच्या या कारंजाच्या दोन्ही बाजूंना असलेले सिंह आणि डॉल्फीन यांच्या तोंडातून पाणी खाली पडू लागले आणि तब्बल बारा वर्षांनी हे कारंजे सुरू झाले. या लोकार्पण कार्यक्रमाला शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका सुजाता सानप, नगरसेवक अनंत नर, समाजवादीचे गटनेते रईस शेख, बाजार उद्यान समिती अध्यक्ष स्मिता गावकर, ए विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर, शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, आमदार राज पुरोहित, पालिकेचे अभियंता संजय सावंत, विकास दिलावरी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आधी आदित्य ठाकरे यांनी बाजूलाच असलेल्या हुतात्मा स्तंभाला पुष्कचक्र अर्पण करून अभिवादन केले.फ्लोरा फाऊंटनच्या दुरुस्तीसाठी खास इण्टॅक (इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट ऍण्ड कल्चरल हेरिटेज) या संस्थेची मदत घेण्यात आली आहे.

पुरातन वास्तूंचा ठेवा जतन करणार! – आदित्य ठाकरे

दक्षिण मुंबईत मोठय़ा संख्येने ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यांचे नूतनीकरण करणे, त्यांचे जतन करणे हे मुंबईच्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे. पुरातन वास्तू काही पालिकेच्या अखत्यारीतील, काही पुरातत्व विभागाकडे तर काही हेरिटेज समितीकडे आहेत. पालिकेच्या अखत्यारीतील पुरातन वास्तू व इमारतींचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी आम्ही प्राधान्य देऊ. मुंबई महापालिकेच्या हद्दीतील पुरातन वास्तूंचे नूतनीकरण व जतन करण्यात येईल व हा पुरातन वस्तूंचा वारसा जपण्यात येईल.

कारंजे सकाळी 8 ते रात्री 8

धुळीमुळे येथील पाणी आणि शिल्प खराब होण्याची शक्यता आहे. हे कारंजे वर्षानुवर्षे तसेच राहावे यासाठी पालिका लवकरच देखभालीचे कंत्राट देणार असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली. हे कारंजे सकाळी 8 ते रात्री 8 सुरू ठेवण्याचा पालिकेचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.