हेरिटेज फिट्झगेराल्ड फाऊंटनला झळाळी; महापालिकेडून सौंदर्यीकरण

मुंबईतील वैभव असलेल्या वास्तूंपैकी एक असलेल्या मेट्रो सिनेमाजवळील फिट्झगेराल्ड फाऊंटन पुन्हा दिमाखात उभा राहत आहे. 45 फूट उंच आणि 19 फूट रुंदीच्या या वास्तूच्या सौंदर्यीकरणाचे काम महापालिकेच्या माध्यमातून सुरू असून महिन्याभरात पूर्ण होणार आहे.

ऐतिहासिक फिट्झगेराल्ड फाऊंटन महाराष्ट्राच्या तत्कालीन गव्हर्नरच्या नावाने 1867 ते 1872 या कालावधीत बांधण्यात आला. जगभरात असे केवळ तीन फाऊंटन आहेत. मात्र, या ऐतिहासिक वास्तूचे 400 भाग गायब झाले होते. शिवाय फाऊंटनवर 7 फुटांवर असणारा दिवाही गायब होता. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून या फाऊंटनच्या सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या वास्तूला मूळ रूप देण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून ब्रिटिश प्रशासनाशी संपर्क साधून माहिती घेण्यात आली. या मूळ स्वरूपानुसार हे काम करण्यात येत आहे. या कामासाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या देखण्या फाऊंटच्या बाजूलाच सेल्फी पॉईंटही उभारण्यात येणार आहे. त्यामुळे फिट्झगेराल्ड फाऊंटन मुंबईकरांसाठी पुन्हा एकदा आकर्षण ठरणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या