पवई आयआयटीच्या विद्यार्थ्यांचे संशोधन; तुटलेले हाड जोडणार ‘जैविक स्क्रू’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईतील आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी तुटलेले हाड जोडण्यासाठी जैविक घटकांचा वापर करून अत्याधुनिक स्क्रू तयार केला आहे. शस्त्रक्रियेदरम्यान शरीरात बसविलेला हा स्क्रू हाड पूर्ववत झाल्यानंतर पुन्हा शस्त्रक्रिया करून काढून टाकण्याची गरज नाही.

फ्रॅक्चर झाल्यावर होणाऱ्या वेदना या असह्य असतात. तुटलेले हाड पुन्हा जोडण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागते. हाड मोडल्यामुळे होणाऱ्या वेदना आणि शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्चही प्रचंड असतो. हा खर्च कमी करण्यासाठी तसेच शस्त्रक्रियेमुळे होणाऱ्या जखमा लवकर भरण्यासाठी आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी अत्याधुनिक जैविक घटकांचा वापर करून स्क्रू तयार केला आहे.

सध्या हाड जोडण्यासाठी इम्प्लांटचा वापर

‘आयआयटी केमिकल इंजिनीअरिंग विभागा’चे प्रा. डॉ. जयेश बेलारे म्हणाले, ‘अपघातात बऱ्याचदा रुग्णांच्या हातापायाला फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. अशा वेळी शस्त्रक्रिया करून मोडलेली हाडे जोडावी लागतात. सध्या हाड जोडताना लोखंडी धातू (इम्प्लांट) चा वापर केला जातो. मात्र आता लवकरच जैविक घटकांपासून तयार केलेल्या स्क्रूचा वापर करण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेनंतर हाड विकसित झाल्यावर हाडांचे पेशी हा स्क्रू नष्ट करतील.

जैविक स्क्रूमुळे संसर्गाचा धोका नाही

जैविक स्क्रूचा वापर केल्यामुळे संसर्गाचा धोकाही टळणार आहे. सद्यस्थितीत आयात केलेले महागडे स्क्रू अस्थीच्या शस्त्रक्रियांसाठी वापरले जातात. मात्र जैविक घटकांपासून तयार केलेल्या स्क्रूमुळे शस्त्रक्रियेच्या जखमा लवकर भरून येतील. आयआयटीच्या ‘सायन्स अँड बायो इंजिनीयरिंग विभागा’चे संशोधक रोहित श्रीवास्तव यांनी सांगितले,‘हाडांची शस्त्रक्रिया करताना वापरण्यात येणाऱ्या आयातीत स्क्रूची किंमत प्रचंड आहे. रुग्णांना या शस्त्रक्रियेचा खर्च परवडत नाही. मात्र जैविक पद्धतीने स्वस्त स्क्रू उपलब्ध झाल्यास या रुग्णांना नक्कीच फायदा होईल.’

  •  या स्क्रूवर आयआयटीमध्ये साधारणतः गेल्या चार वर्षांपासून संशोधन सुरू होते.
  • सुरुवातीला प्राण्यांवर या स्क्रूचा प्रयोग करण्यात आला असून तो यशस्वी ठरला आहे.
  • स्वस्त आणि सुरक्षित असलेल्या या स्क्रूचा वापर सरकारी आणि पालिका रुग्णालयांतील रुग्णांना व्हावा यासाठी आयआयटीद्वारे मान्यतेसाठी ‘ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ (डीसीजीआय) ला लेखी पत्र पाठवण्यात आले आहे.
  • या संशोधनासाठी ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने अर्थसहाय्य दिले असून हे संशोधन बायोमेडिकल जर्नलच्या अंकात प्रसिद्ध झाले आहे.