
बारच्या परवान्यासाठी वय लपवून खोटी कागदपत्रे सादर केल्या प्रकरणी अडचणीत सापडलेले एनसीबी मुंबईचे माजी संचालक समीर वानखेडे यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी तसेच बारचा परवाना परत मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. वानखेडे यांनी उच्च न्यायालयात दोन वेगवेगळ्या याचिका केल्या असून त्यावर उद्या मंगळवारी सुनावणी होणार आहे.
नवी मुंबईच्या वाशी येथे समीर वानखेडे यांच्या नावावर सद्गुरू बार आणि रेस्टॉरंट नावाचा परवाना होता. हा परवाना 27 ऑक्टोबर 1997 रोजी घेण्यात आला असून परवाना घेताना वानखेडे यांनी आपले वय लपवले होते. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ही बाब उघडकीस आणली असून यातील तथ्य समोर आल्या नंतर ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी बारचा परवाना रद्द केला. तसेच या प्रकरणी समीर वानखेडे यांच्या विरोधात ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा रद्द करण्यासाठी अॅड रिझवान मर्चंट यांच्या मार्फत वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे तसेच बारचा परवाना परत मिळावा यासाठी अॅड विशाल थडाणी यांच्या मार्फत याचिका दाखल केली आहे. या याचिकांवर उद्या मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.



























































