परीक्षण – व्यामिश्र अनुभवाच्या ग्रामीण कथा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>सुधाकर वसईकर

मराठी साहित्यात ग्रामीण कथेला खूप महत्त्व आहे. द. मा. मिरासदार, ग. दि. माडगूळकर, शंकर पाटील आणि इतरांच्या कथा आवडीने वाचल्या जातात. बोलीभाषेचा गोडवा आणि सशक्त कथाबीज, कथानक यामुळे या कथा वाचकप्रिय झाल्या आहेत. अनेक लेखकांना ग्रामीण कथा, बोलीभाषेत कथा लिहिण्याचा मोह होत असतो, पण मोजक्याच जणांना सकस आणि सशक्त ग्रामीण कथा लिहिण्यात यश मिळते. समकालीन पिढीतील आश्वासक ग्रामीण कथा लेखक म्हणून जे नाव घेता येईल ते म्हणजे सुचिता घोरपडे.

2020 साली त्यांचा पहिला ‘खुरपं’ कथासंग्रह प्रकाशित झाला, वाचकांच्या पसंतीस उतरला आणि मान्यवर समीक्षकांनीही या संग्रहाची दखल घेतली. अनेक पुरस्कारांनी संग्रहास गौरविण्यात आले. नुकताच त्यांचा ‘सांजड’ हा दुसरा कथासंग्रह सॅम प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.

ग्रामीण जीवन, दारिद्रय़, अज्ञान, रूढीप्रियता आणि कौटुंबिक ताणतणाव यांचे समग्र चित्रण सुचिता घोरपडे यांच्या कथेत येते. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागाच्या काठावरल्या मुलखातील परिसरात घडणाऱया या कथांना कोल्हापुरी भाषेचा अनोखा बाज असून कानडी भाषेचाही खुबीने वापर केलेला आहे. ग्रामीण भाषेतील म्हणी, वाक्प्रचार, आणि पद्य पंक्तींनी कथावकाश गडद होत जाते. महत्त्वाचे म्हणजे लेखिका खेडुतांच्या जीवनाकडे त्याच दृष्टिकोनातून पाहते. नागरी जाणिवांनी त्यांचा अपभ्रंश करीत नाहीत. बोलीभाषेतून साकारलेल्या या कथा म्हणूनच थेट वाचकांशी संवाद साधतात. प्रत्यक्ष कथन, निवेदनही ग्रामीण बोलीभाषेतून असल्याने निखळ ग्रामीण कथा ’सांजड’मध्ये वाचणे म्हणजे एक समृद्ध अनुभव!

ग्राम्य बोलीभाषेच्या शब्दांतून केलेले कथांमधील स्थळ, काळ, घटना, प्रसंग, वस्तू, गाव, यात्रा आणि निसर्गाचे चित्रण प्रत्ययकारी आहे. केवळ 136 पृष्ठसंख्या असलेल्या कथासंग्रहात एकूण 11 कथा आहेत. कथांमधून शोषितांच्या वेदना शब्दबद्ध केल्या असून अज्ञानातून आलेली अंधश्रद्धा, भय, भूक यांनी हतबल झालेली जितीजागती माणसं स्वतच्या अस्तित्वासाठी झगडताना दिसतात.

संग्रहातील कथा स्त्राrवादी नसल्या तरी कथेच्या केंद्रस्थानी स्त्राrच आहे. रूढीग्रस्त, शोषित, असहाय आणि दारिद्रय़ाने पिचलेली असली तरी कुटुंबाला धरून असलेली स्त्राr रूढीप्रिय समाज व्यवस्थेशी जुळवून घेऊन आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसते. त्याच वेळेस याच समाज व्यवस्थेतील काही पुरुष तिचा आधार बनू पाहतात, तिला साथ देताना दिसतात असा व्यामिश्र अनुभव देणाऱया कथा म्हणूनच अनोख्या वाटतात. त्यातीलच एक शीर्षक कथा म्हणजे ‘सांजड’. प्रस्तुत कथेत रूपाच्या अंगाची हळद पुरती फिटलेली नसताना पाठ-परतावणी करून येताच तिचा धनी एका अपघातात जातो आणि तिला वैधव्य येतं. कालांतराने बाप एका थोराड धनिकाशी तिचं लग्न लावून द्यायला निघतो. तेव्हा तिचा सख्खा दीर तिच्याशी लग्न करतो आणि पुन्हा आपल्या घरी घेऊन येतो.

‘ख्योळ’ कथेत पंचगंगामाईच्या कात्यायनी देवीचं आणि मंदिराचं ग्राम्य शब्दांतील वर्णन शब्दातीत आहे. देवळातील पाषाणमूर्तीत देव दिसत असला तरी तो माणसांतच वसत असतो याचा प्रत्यय देणाऱया या कथेतील दैववाद, नियतीच्या खेळाचं चित्रण विचारप्रणव आहे.

‘धुंदरुक’ आणि ‘काचणी’ या कथांतून गावाकडील टिपिकल, भावकी आणि कौटुंबिक कलहाचं बारकाईनं रेखाटलेलं चित्रण गुंतवून ठेवणारं आहे. ग्राम समाज व्यवस्थेतील शोषित जाणिवांचा आवाज कथांमधून संयतपणे प्रकटलाय. बोलीभाषा उच्चारांनुसार नवीन शब्दांची रुजवात करून जात्यावरील अर्थपूर्ण ओव्या आणि पद्य पंक्तीनी कथानक रंजक होऊन कथावकाश आणखी गडद होत जातं हे या कथांचं बलस्थान म्हणावं लागेल. आपसूकच वाचक प्रसंगांशी तादात्म्य पावत जातो, इतकी घट्ट पकड ओघवत्या कथन शैलीत आहे. प्रसंगातील बारकावे टिपण्याची हातोटी लेखिकेला गवसलेली असल्याने कथा अवलोकनाच्या पातळीवर खरी उतरते.

सांजड लेखिका : सुचिता घोरपडे
प्रकाशक : सॅम पब्लिकेशन्स
पृष्ठसंख्या : 136, मूल्य : 180 रुपये