‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ – एका सुपरस्टारचा उदयास्त

2403

>>रश्मी पाटकर, मुंबई

कलावंत म्हणजे मुठीत पकडलेली सोनेरी वाळू असते. जितकी धरायला जावी, तितकी हातातून निसटत जाणारी. पण, तरीही आकर्षक, हवीहवीशी.. पण, कलावंत होणं सोपं नसतं. प्रचंड चढ-उतार, मानसिक-भावनिक द्वंद्व, कधी यशाची शिखरं तर कधी पराजयच्या नरकयातना.. हे सगळं सोसून कलावंत आपलं मनोरंजन करत असतात. मात्र, तरीही ते आपल्यासाठी कलंदर असतात. कारण, त्यांचं कलेवरचं प्रेम जितकं गहिरं असतं तितकाच त्यांच्या आयुष्याचा पट मात्र एखाद्या रोलर कोस्टर राईडसारखा असतो. कलेचं आव्हान पेलत आपल्या मनोरंजनाचं चित्र चितारणाऱ्या कलावंताचं आयुष्य रेखाटणं आणि समजून घेणं हेही तितकंच अवघड काम आहे. आणि ते साकारण्याचं धाडस ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट करतो.

या चित्रपटाच्या नावातच त्याचं वैशिष्ट्य ठळकपणे समोर येतं. विशेषतः ज्यांनी घाणेकर यांचा अभिनय पाहिलेला नाही, त्यांच्यासाठी हा चित्रपट मराठी रंगभूमीच्या एका सुपरस्टारचं आयुष्य अवघ्या अडीच तासात मांडतो. चित्रपटाची कथा साधारण 60च्या दशकातली आहे. सुमारे चार ते पाच दशकांपूर्वी हिंदी चित्रपटांमुळे मराठी रंगभूमीचा पडता काळ सुरू होता. आणि त्याच वेळी मुंबईतला एक प्रथितयश डेंटिस्ट आपली चांगली चाललेली प्रॅक्टिस सोडून नाटकांमध्ये पडेल ती कामं करत हिंडत होता. पण, एक दिवस प्रा. वसंत कानेटकर यांच्या नाटकासाठी संभाजीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचा शोध सुरू होतो आणि मास्टर दत्ताराम या रंगकर्मींना डॉ. घाणेकरांच्या रुपात संभाजी गवसतो. मग, मराठी रंगभूमीवर सुरू होतं काशिनाथ पर्व. ज्या अभिनेत्याच्या प्रवेशाला टाळी वाजली, ज्याच्या संवादफेकीसाठी शिट्टी वाजली, ज्याने फक्त आपल्या नावावर हाऊसफुल्लचे बोर्ड झळकवले, अशा कलंदर सुपरस्टारचा अभिनयाचा प्रवास आणि त्याचं वैयक्तिक आयुष्य हा चित्रपट रेखाटतो. एक डॉक्टर ते एक कलाकार, मराठी रंगभूमीवरचा पहिला सुपरस्टार ते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत जगत असलेला अभिनय असा डॉक्टर घाणेकरांचा प्रवास हळूहळू उलगडत जातो.

या चरित्रपटाची कथा बेतली आहे, ती कांचन काशिनाथ घाणेकर यांच्या ‘नाथ हा माझा’ या पुस्तकावर. मात्र, हा चित्रपट डॉ. घाणेकरांच्या दृष्टिकोनातून आपल्याला दिसतो. कथेचा काळ साधारण 15 ते 20 वर्षांचा आहे. त्यामुळे ते बदल आपल्याला चित्रपटात दिसून येतात. पण, घाणेकर आणि लागू यांच्या प्रतिस्पर्धी असण्यातलं नाट्य मात्र अकारण ताणलं गेल्यासारखं वाटतं. त्याच्याऐवजी घाणेकरांच्या मनाचे आणखी काही पैलू उलगडता आले असते, तरी चाललं असतं. या चित्रपटात खूप व्यक्तिरेखा आहेत. पण, त्यात प्रामुख्याने चार ते पाच व्यक्तिरेखांवरच हा चित्रपट केंद्रित झाला आहे. एक स्वतः डॉ. घाणेकर, प्रभाकर पणशीकर, डॉ. इरावती घाणेकर, सुलोचना दीदी आणि कांचन घाणेकर. त्यामुळे बाकीच्या व्यक्तिरेखांना फारसा वाव नाही. पण, तरीही कलाकारांनी त्या चोख बजावल्या आहेत. यात विशेष कौतुक करावं लागेल ते घाणेकरांचे समकालीन अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या भूमिकेतील सुमीत राघवन यांचं. सुमीत यांनी डॉ. लागूंची भूमिका करण्याचं शिवधनुष्य पेललं आहे. तसंच भालजी पेंढारकर यांची भूमिका मोहन जोशी यांनी ताकदीने साकारली आहे.

पाहा या चित्रपटाचा ट्रेलर-

डॉ. घाणेकर यांच्या मध्यवर्ती भूमिकेत झळकलेला सुबोध भावे याने पुन्हा एकदा सिक्सर हाणला आहे. बेफिकीर आणि बेदरकार आयुष्य जगणारा अभिनेता, एका रंगकर्मीच्या आयुष्याला असलेले कंगोरे, त्याची स्वतःची आव्हानं आणि दुसरीकडे मिळणारी अमाप लोकप्रियता यांच्या कातरीत सापडून वाहवत जाणारे घाणेकर सुबोधने संपूर्ण ताकदीनिशी साकारले आहेत. सुबोधने यापूर्वी साकारलेल्या बालगंधर्व आणि लोकमान्य टिळक यांच्या व्यक्तिरेखांना जसा त्याने न्याय दिला होता. तसाच तो घाणेकरांनाही दिला आहे. घाणेकर आणि सुबोध यांच्यात दृश्यमानाने काहीही साम्य नाही. पण, गेटअपच्या जोडीने त्याने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची गाठ पुन्हा एकदा घाणेकरांशी घालून दिली आहे. रंगमंचावर प्रयोग सादरीकरणावेळी घाणेकरांचं भूमिकेतलं ऑन-ऑफ होणं, एकाच वेळी मनात आणि चेहऱ्यावर वेगवेगळे भाव स्पष्टपणे दिसून येणं हे सुबोधने ज्या पद्धतीने दाखवलंय, ते निव्वळ लाजवाब. त्याला साथ मिळाली आहे ती घाणेकर यांच्या प्रथम पत्नी डॉ. इरावती झालेल्या नंदिता पाटकर या अभिनेत्रीची. कलंदर नवऱ्यापेक्षा संपूर्ण विरुद्ध स्वभावाची, नवऱ्याला सर्वतोपरी सांभाळून घेणारी पण तरीही त्याच्याशी कधीच एकरूप न होऊ शकलेली बायको नंदिता हिने उत्तम साकारली आहे. प्रसाद ओक याने साकारलेले प्रभाकरपंत पणशीकरही दाद मिळवून जातात. कांचन घाणेकर ही भूमिका साकारणाऱ्या वैदेही परशुरामी हिचं विशेष अभिनंदन करायला हवं, कारण इतक्या तगड्या कलावंतांच्या मांदियाळीत तिने समजून उमजून भूमिका केली आहे. त्यामुळे तिची भूमिकाही लक्षात राहते. सुलोचना दीदींच्या भूमिकेत मात्र सोनाली कुलकर्णी मिसफिट वाटतात. त्यांनी भूमिका चांगली केली असली, तरी त्यात काहीतरी कमी असल्यासारखं वाटत राहतं.

हा चित्रपट अभिजित शिरीष देशपांडे यांनी दिग्दर्शित केला आहे. घाणेकर हे त्यांच्या समकालीन कलावंतांना कधी पूर्णपणे कळलेच नाहीत, असं म्हटलं जातं. पण, अभिजित यांनी मात्र त्यांना समजून घेऊन न्याय देण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे. एवढ्या मोठ्या कलाकाराचा जीवनपट पडद्यावर साकारणं हे सोपं काम नाही, मात्र अभिजित यांनी हे आव्हान सुंदररित्या पेललं आहे. चित्रपटात तांत्रिक बाजू मात्र काहीशी कमकुवत वाटते. फ्रेम्स उत्तम असल्या तरी नेपथ्यात मात्र चित्रपट उणा ठरतो. 1960चं दशक उभं करताना काही उणिवा स्पष्टपणे दिसून येतात. तीच बाब घाणेकर यांच्या गेटअपची. घारे, भेदक डोळे ही घाणेकरांना मिळालेली देणगी होती. मात्र, सुबोधला देण्यात आलेल्या निळ्या लेन्समुळे मात्र ती नजरच हरवल्याचं जाणवत राहतं. तांत्रिक बाजुंकडे अजून चांगलं लक्ष देता आलं असतं, तर चित्रपट आणखी सुंदर करता आला असता.

डॉ. काशिनाथ घाणेकर हे व्यक्तिमत्व वादळी होतं. अनेक वाद ओढवून घेऊनही ते रंगभूमीचे सुपरस्टार राहिले. त्यांचं वादळी आयुष्य अडीच तासात सामावून पाहताना आपण नकळत 1960 व नंतरच्या दशकांचे पुन्हा एकदा साक्षीदार होतो. त्यामुळे काशिनाथ पर्व पुन्हा एकदा पाहायचं असेल किंवा जाणून घ्यायचं असेल, तर हा चित्रपट अवश्य पाहावा.

summary- review of ani dr. kashinath ghanekar

आपली प्रतिक्रिया द्या