
>>वर्णिका काकडे
समाजात मोठे योगदान देणाऱ्या आणि सर्वसामान्यांना प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींची आत्मचरित्रे वाचकांच्या विशेष पसंतीस उतरतात. लेखक, कलावंत, राजकारणी, उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते आदींची आत्मचरित्रे लोकप्रिय ठरताना त्यातील विशेष भागाबद्दल वाचकांना कुतूहल असते. विशेषत: राजकारणी व्यक्तींचं खासगी आयुष्य आणि त्यांचं राजकीय आयुष्य यातील अनेक गोष्टी जाणून घेण्यास वाचक उत्सुक असतात. याबरोबरच अशा व्यक्तींच्या आत्मकथांना वेगळं वलय असतं आणि यामुळेच ती प्रकाशित झाल्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी प्रकाशझोतात राहतात. गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकाशझोतात असणारं चरित्रपट मांडणारं पुस्तक म्हणजे मोहन भागवत – इन्फ्लुएन्शर इन चीफ. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांच्या राजकीय जीवनावर आधारीत या पुस्तकाचे लेखक आहेत किंगशुक नाग. किंगशुक नाग यांनी याआधी 8 चरित्रपट मांडणारी पुस्तकं लिहीली आहेत. ज्यात दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या चरित्रपटाचा समावेश होतो.
या पुस्तकाबाबत एक महत्त्वाची नोंद घ्यायला हवी ती म्हणजे हे पुस्तक मोहन भागवत यांचा जीवनपट मांडणार नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत त्यांचं आयुष्य, संघाला मिळत गेलेली दिशा आणि या पार्श्वभूमीवर संघ व त्या अनुषंगाने मोहन भागवत यांचं प्रस्थापित झालेलं नेतृत्व अशा महत्त्वांच्या गोष्टींचा धांडोळा या पुस्तकात घेण्यात आला आहे. एकाअर्थी हे पुस्तक मोहन भागवत यांचं संघाशी एकवटलेलं आयुष्य मांडतं आणि त्याबरोबरच सध्याच्या राजकीय स्थितीबाबतही भाष्य करतं.
मोहन भागवत आणि आरएसएस यांचा वेगळ्या परिप्रेक्ष्यातून वेध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला गेला आहे. भाजपच्या यशात संघाचा वाटा मोठा आहेच. मात्र ही बलस्थानं वाढताना संघाचं महत्त्व तितकंच अबाधित ठेवण्यात भागवतांना यश आलं आहे का, सध्याचे सरकार केवळ संघाच्या प्रभावाखाली काम करते का, सरकारची सर्व धोरणं संघाच्या प्रेरणेनेच आखली जातात का आणि भाजप आणि मोदी यांना सत्तेत आणण्यासाठी सरसंघचालक म्हणून मोहन भागवत यांनी कोणते प्रयत्न केले या प्रश्नांबाबत वेगवेगळ्या अंशातून उत्तरं देण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे.
2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक अभ्यास म्हणून हे पुस्तक अगदी योग्य ठरणारे आहे. याबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य, सरसंघचालक या पदाचे महत्त्व आणि मोहन भागवत यांचे संघीय जीवन जाणून घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचायला हवे.




























































