अभिप्राय : समाज वास्तवाचे दर्शन

10


>> माधुरी महाशब्दे

परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. काळ बदलतो. काळानुरूप मानवी जीवन बदलत जाते. मूल्ये बदलतात त्यातून समाजासमोर नव्या गंभीर समस्या उभ्या राहतात. समलिंगी संबंध ही आज एक ज्वलंत समस्या आहे. त्याचे व्यक्तीवर, कुटुंबावर, समाजावर होणारे परिणाम समोर कल्पून लेखल्याने प्रस्तुत पुस्तकात त्यातील वास्तव समोर ठेवले आहे.

‘टुमॉरो शॅल कम’ या पुस्तकातील विविध व्यक्तिरेखांच्या माध्यमातून समलिंगी संबंध, तसेच मानवी जीवनातील इतर बदल, समस्या, बदलती मूल्ये, बदलते नातेसंबंध, भरकटलेली तरुणाई यावर प्रकाश टाकला आहे. पारंपरिक मूल्य संस्कार व बदलती जीवनमूल्ये, आचारविचार यांची सांगड घालण्याचे मोठे आव्हान आज उभे ठाकले आहे.

गणेशची लेक सीमा लग्नाशिवाय विवाहित रशीदपासून गर्भवती राहते. त्याची लाज नाही, खंत नाही. उलट ते मूल वाढवण्याचा निश्चय करते. ‘हा माझा खासगी प्रश्न आहे, निर्णय सर्वस्वी माझा आहे. स्त्र्ााr म्हणून मातृत्वाची आस व करीयर यांचा ताळमेळ मी साधला.’ तिचा पिता मात्र यामुळे आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो.

बर्वेंची मुलगी गायत्री डॉक्टर आहे. तिचा डॉक्टर पती दिलीपराव अनैतिक, भ्रष्ट मार्गाने पैसा मिळवण्याच्या मागे आहे. गायत्रीने विरोध दर्शवला तर तिचा मानसिक छळ, अपमान करतो. ते असह्य होऊन ती घर सोडून जाते. तिचे आईवडील मात्र स्त्र्ााrने कसलाही त्रास सहन करत संसार टिकवून धरला पाहिजे या विचाराचे. बर्वेंची दुसरी मुलगी मोहिनी. तिला एकाच वेळी मुलींबद्दल द्वेष व प्रेम वाटते. मुलींमध्ये होणारे शारीरिक बदल तिच्यात दिसत नाहीत. मुलींसारखे नटणे, लाजणे, मुरडणे तिला विचित्र वाटते. मुलींमधला भरदारपणा तिला आवडतो. एका वेगळय़ाच रसायनाने ती घडली जात असते. तिची मैत्रीण शालू उभयलिंगी आहे. तिच्या वर्तनाने प्रचंड मानसिक धक्का, आघात बसतो. हिस्टेरिक होते, पण त्यातून सावरून आपले आयुष्य आयुर्वेदाला वाहून घेण्याचा निश्चय करते. बर्वेंचा मुलगा श्रीधर करिअरिस्ट, हुशार. पण त्याच्या रूपानेही एक भयंकर सत्य समोर येते. मित्र महेशची संबंध – श्रीधरला मुलींसारखे कपडे, राहणे आवडते. ही गोष्ट उघड होताच मोठा धक्का. स्वातीला श्रीधरशी लग्न करायची इच्छा, पण ते तो टाळतो. स्वातीला सत्य समजल्यावरही ती बर्वेंची सून म्हणून राहायला तयार होते. त्यामुळे बर्वे मनातून ढासळले जात आहेत.

आजची तरुण पिढी ही भरकटलेली. रवीसारखे तरुण दिशाहीन होत आहेत. आज समाजात कोणाबद्दल आदर नाही, स्वैराचार, बलात्कार, व्यसने यांनी पोखरली गेलेली पिढी दिसून येते. हे सारे हताशपणे बघणारे आहेत, तसेच खडसे काकांसारखे हताश न होणारे, त्यावर उपाय शोधणारे, असहाय्य, भरकटलेल्यांना आधार देणारे आशेचे स्तंभही आहेत. ‘आधार’ अशा सर्वांचे आश्रयस्थान आहे. आजच्या सामाजिक, कौटुंबिक, वैयक्तिक जीवनातील गंभीर समस्यांना, आव्हानांना सामोरे जाऊन त्याकडे सकारात्मकतेने कृती करण्याची गरज या माध्यमातून लेखक व्यक्त करतात. समलिंगी संबंध आजही आपला समाज स्वीकारायला तयार नाही. त्यातून अशा व्यक्तींना माणूस म्हणून जगणे कठीण होते. नैराश्य, एकाकीपणा याने ते ग्रासले जातात. यावर ‘आधार’सारखी समाजसेवा हाच कदाचित उपयुक्त उपाय ठरू शकेल असा आशावाद व्यक्त होतो.

टुमॉरो शॅल कम
लेखक – गजानन पांडे
प्रकाशन – विजय प्रकाशन
पृष्ठ – 184, मूल्य – 250 रुपये

आपली प्रतिक्रिया द्या