कोलकाताच्या आरजी कर महाविद्यालय आणि रुग्णालयात ट्रेनी डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आली. त्यानंतर कनिष्ठ डॉक्टर प्रचंड आक्रमक झाले असून सुरक्षेच्या मागण्यांसह विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहे. 21 सप्टेंबर रोजी आंदोलन मागे घेऊन पुन्हा डय़ुटीवर रुजू झालेल्या डॉक्टरांनी आज पुन्हा महाविद्यालय ते धरमतलपर्यंत मोर्चा काढला. कोलकात्यातील रुग्णालयांत सुरक्षित वाटत नसून राज्य सरकारकडून पुर्णपणे सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे. त्याचबरोबर सरकारकडून कुठल्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोपही केला आहे.