प्रासंगिक मीटर रिकॅलिब्रेशन, रिक्षा-टॅक्सी चालकांना नियम पाळावेच लागतील!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परिवहन विभागाने भाडेवाढ दिली असली तरी मुंबईतील 65 हजारहून अधिक रिक्षा-टॅक्सी चालकांनी नव्या भाडेवाढीनुसार आपल्या मीटरमध्ये बदल केलेले नाहीत. त्यामुळे अनेकदा प्रवाशांची लूट होते, वादही होतात. याबाबत विभागीय परिवहन अधिकारी (मध्य) भरत कळसकर यांच्याशी संवाद साधला असता रिक्षा-टॅक्सी चालकांना धंदा करायचा असेल तर नियम पाळावेच लागतील, असे बजावले.

 रिक्षा-टॅक्सीचे मीटर रिकॅलिब्रेशन करणे का बंधनकारक आहे?

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणाने (एमएमआरटीए) रिक्षाच्या भाडय़ात दोन तर टॅक्सीच्या भाडय़ात तीन रुपयांची वाढ केली आहे. त्यानुसार मोटार वाहन कायद्याप्रमाणे रिक्षा-टॅक्सी चालकांनी आपल्या मीटरमध्ये बदल करणे अवश्यक आहे. त्यासाठी त्यांना साडेतीन महिन्याची मुदत दिली आहे. ती रविवारी संपली आहे. त्यामुळे ज्यांनी आपल्या मीटरमध्ये बदल केले नाहीत त्यांनी वाढीव दराने भाडे घेणे बेकायदेशीर ठरते. त्यामुळे त्यांनी मीटर रिकॅलिब्रेशन करणे बंधनकारक आहे. जे करणार नाहीत त्यांना दंडाचा दणका बसणार हे निश्चित आहे.

मीटर रिकॅलिब्रेशनबाबत उदासीनता का?

मोटार वाहन कायद्यानुसार भाडेवाढीनंतर मीटर रिकॅलिब्रेशन करणे अवश्यक आहे. मात्र मीटर रिकॅलिब्रेशन न केल्याचे कारण देत प्रवाशांकडून जादा भाडे वसूल करता येते असा रिक्षा-टॅक्सी चालकांचा गैरसमज झाला आहे. मात्र ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे. मिळालेली भाडेवाढ घेण्यासाठी अद्याप मीटर रिकॅलिब्रेशन न केलेल्या रिक्षा-टॅक्सी चालकांनी तत्काळ करावे.

प्रवाशांनी काय खबरदारी घ्यायला हवी?

रिकॅलिब्रेशनसाठी दिलेली मुदत संपली आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाच्या सुरुवातीला रिक्षा-टॅक्सीच्या मीटरवर लक्ष देऊन पहिल्या टप्प्यासाठी किती भाडे पडले आहे त्याची खात्री करावी. तसेच एखादा रिक्षा-टॅक्सी चालक मीटरऐवजी मॅन्यूवल कार्डप्रमाणे भाडे मागत असेल तर त्याला साफ नकार देत परिवहन विभागाकडे 9076201010 या हेल्पलाईनवर कॉल करून तक्रार करावी. त्यासाठी परिवहन विभागाने स्वतंत्र स्क्वॉड तयार केले आहे.