
सामना ऑनलाईन। न्यूयॉर्क
बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषि कपूर गेल्या अनेक महिन्यांपासून अमेरिकेत उपचार घेत आहेत. पण ते नक्की कोणत्या आजारावर उपचार घेत आहेत याबद्दल मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी गुप्तता ठेवली आहे. यामुळे त्यांचे चाहतेही संभ्रमात आहे. याच पार्श्वभूमीवर एका हिंदी वाहीनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी उपचार पूर्ण झाल्यानंतर लवकरच मायदेशी परतणार असल्याचे सांगितले.
ऋषि कपूर पत्नी व मुलांसह अचानक अमेरिकेत गेल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर ऋषि कपूर कॅन्सरवरील उपचारासाठी अमेरिकेत गेल्याची चर्चा सुरू झाली. याचदरम्यान नीतू कपूर यांनी अनेक वेळा इन्स्टाग्रामवर ऋषि यांचे कुटुंबीयांसोबतचे फोटोही पोस्ट केले होते. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांनी या जगात कॅन्सर हे नाव फक्त राशीपुरतेच शिल्लक राहायला हवं अशी पोस्ट टाकत ऋषि यांना कॅन्सर झाल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले.
पण आता हंगामा या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ऋषि यांनी माझ्यावर उपचार सुरू असून अपेक्षा आहे की लवकरच बरा होऊन घरी परतणार असल्याचे म्हटले आहे. तसेच उपाचाराची मोठी प्रक्रिया असून यातून जाण्यासाठी मोठं धैर्य लागतं ज्याची माझ्यात कमतरता आहे, असे सांगितले. त्याचबरोबर सध्या मी चित्रपटांचा विचार करत नसून शांत चित्ताने आनंदित राहू इच्छितो असं म्हटलं. मात्र एप्रिलमध्येच ऋषि कपूर यांच्यावरील उपचार पूर्ण होत असून ते तेव्हाच घरी परतणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.





























































