
सामना प्रतिनिधी । मुंबई
अंधेरी येथील गोखले पूल कोसळल्याच्या घटनेला २४ तास उलटत नाहीत तोच बुधवारी मुंबईकरांना आणखी एका मनस्तापाला सामोरे जावे लागले. नवी मुंबईतील ऐरोलीत रेल्वे रुळाला तडे गेल्याने ठाणे-वाशी ट्रान्सहार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. सकाळी ऐनगर्दीच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे चाकरमान्यांचे हाल झाले. वारंवार हार्बर ठप्प होण्याच्या घटनांमुळे प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट झाला. तर मुंबईत ग्रॅण्ट रोड येथील पुलाला तडे गेल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट होती. दुरुस्तीसाठी हा पूल दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आला. मंगळवारी रात्रीच ही बाब उघडकीस आल्यामुळे आज सकाळपासूनच या पुलावरील वाहतूक केनेडी पुलावरून वळवण्यात आली. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. हे असे हाल सुरू असतानाच वरळीत मेट्रोच्या कामामुळे सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला मोठमोठे तडे गेल्याची धक्कादायक बाबही उघडकीस आली. त्यामुळे दक्षिण मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक कासवगतीने सुरू होती.
ग्रॅण्ट रोडच्या पुलाला तडे… चाकरमानी हादरले, वाहतूक केनेडी ब्रिजवरून वळवली
मुंबई
अंधेरीचा रेल्वे पादचारी पूल कोसळल्याच्या दुर्घटनेला 24 तास उलटत नाहीत तोच आज सकाळी ग्रॅण्ट रोड स्थानकाजवळच्या वाहतूक पुलाला तडे गेल्याचे आढळून आले. ग्रॅण्ट रोड पूर्व-पश्चिम जोडणाऱया या पुलावरील वाहतूक तातडीने बंद करण्यात आली होती. पुलाच्या पृष्ठभागावरील तडे बुजवल्यानंतर दुपारनंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
ग्रॅण्ट रोड स्थानकाला लागून असलेल्या वाहतूक पुलावर तडे गेल्याची बाब मंगळवारी रात्री ११ वाजता स्थानिकांच्या लक्षात आली. त्यामुळे आज सकाळपासूनच या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. नाना चौकातून लॅमिंग्टन रोडकडे जाणारी वाहतूक केनेडी ब्रिजवरून वळवण्यात आली होती. पुलावरील भलेमोठे तडे दाखवणारे फोटो आज सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यामुळे मुंबईकरांमध्ये घबराट पसरली होती. अंधेरीचा पूल कोसळल्यानंतर आज रेल्वेची वाहतूक सुरू झाल्यामुळे चाकरमानी आज रेल्वेने कामावर जाण्यास बाहेर पडलेले असतानाच ग्रॅण्ट रोडच्या पुलाची बातमी आल्यामुळे ही घबराट आणखीनच वाढली होती.
पुलाला कोणताही धोका नाही
सकाळपासून बंद ठेवण्यात आलेला ग्रॅण्ट रोडचा पूल दुपारनंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पुलावरील तडे मास्टिकने बुजवण्यात आले. त्यानंतर पालिकेचे अभियंते आणि रेल्वेच्या अभियंत्यांनी पाहणी करून पुलाला कोणताही धोका नसल्याची खात्री करून वाहतूक पूर्ववत सुरू केली. पुलाला कुठलाही धोका नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुलावरून वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ऐरोलीजवळ रेल्वे रुळाला तडे… उपनगरी सेवा ठप्प, हजारो नोकरदार अडकले
नवी मुंबई
पारसिक बोगद्याजवळ आज रुळाला तडे गेल्याची घटना दुपारी घडली. त्यामुळे नवी मुंबईतून कल्याण दिशेने निघालेली मालगाडी क्रॉसिंगवर अडकून आणि ठाणे-वाशी ट्रान्स हार्बर मार्गावर लोकल गाडय़ांची वाहतूक दोन तास ठप्प झाली. ऐन गर्दीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. गेल्या पाच दिवसांत हार्बर ठप्प होण्याचा दुसरा प्रकार घडल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
ठाणे-वाशी ट्रान्स हार्बर मार्गावर पारसिक बोगद्याजवळ आज दुपारी सव्वातीनच्या सुमारास रुळाला तडे गेले. त्याच वेळी तुर्भे यार्डातून कल्याणच्या दिशेने निघालेली मालगाडी दिघ्याच्या पुढे आली होती. रुळाला तडे गेल्यामुळे ती क्रॉसिंगवर थांबवण्यात आल्याने ट्रान्स हार्बर मार्गावरील उपनगरी गाडय़ांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अप आणि डाऊन मार्गावर गाडय़ांची एकापाठोपाठ एक अशी रांग लागली. हजारो प्रवासी रेल्वे स्थानकात आणि लोकलमध्ये अडकून पडले.
या घटनेनंतर रेल्वेच्या दुरुस्ती पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दुरुस्तीचे काम हाती घेतले. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर लोहमार्गाची दुरुस्ती करण्यात दुरुस्ती पथकाला यश आले. त्यानंतर सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास अडकलेली मालगाडी पुढे काढण्यात आली आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील उपनगरी गाडय़ांची वाहतूक सुरळीत सुरू झाली.
ऐरोली रेल्वे स्थानकानजीक ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे शनिवारी दुपारी ट्रान्स हार्बरवरील लोकल गाडय़ांची वाहतूक अडीच तास ठप्प झाली होती. त्यानंतर पाच दिवसांनी आज पुन्हा ट्रान्स हार्बर ठप्प झाली. ट्रान्स हार्बरवर तांत्रिक बिघाडाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागल्याने प्रवाशांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
वरळीत मेट्रोच्या कामामुळे रस्त्याला तडे
मुंबई
वरळीतील सासमीरा कॉलेज आणि ग्लासगो कंपाऊंड यादरम्यान सी.सी.रोडला मोठय़ा प्रमाणावर तडे गेले आहेत. येथून वाहने चालवणे अत्यंत मुश्कील झाले असून मोटारबाईकस्वारांचे रोज घसरून अपघात होत आहेत. याठिकाणी कुलाबा-वांद्रे-सीप्झ या जमिनीखालून जाणाऱया मेट्रोमार्गासाठी काम सुरू आहे. दिवसरात्र सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे येथील रस्त्याला तडे गेल्याच्या आणि वाहनांचे अपघात होत असल्याच्या अनेक तक्रारी मुंबईकरांनी केल्या आहेत.
याबाबत शिवसेनेच्या वतीने मुंबई महानगरपालिका आणि एमएमआरसीएलच्या अधिकाऱयांना या रस्त्याचे काम लवकरात लवकर करून घेण्याबाबतचे निवेदन दिले आहे. एमएमआरसीएलच्या अधिकाऱयांनीही या रस्त्याची पाहाणी करून त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येईल असे सांगितले. मेट्रोच्या कामांमुळे आधीच अरुंद झालेला रस्ता आणि त्यात रस्त्याला गेलेले तडे यामुळे नागरिक प्रचंड त्रस्त असून हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यावा अशी मागणी वरळीतील नागरिकांनी केली आहे. याप्रकरणी युवासेनेचे उपविभाग अधिकारी अभिजीत पाटील यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या. त्यानंतर पाटील यांनी मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांना याप्रकरणी एक निवेदन दिले. जैन यांनी एमएमआरसीएलचे अतिरिक्त महाव्यवस्थापक रोहित टिळक यांना पत्र पाठवून या रस्त्याचे काम लवकरात लवकर करून घेण्याची विनंती केली आहे. दरम्यान, रोहित टिळक यांनी या रस्त्याची पाहणी करून लवकरात लवकर हा रस्ता नागरिकांसाठी पूर्ववत करून देण्याचे आश्वासन दिले आहे.


























































