घोडवली घाटात रस्ता खचला, अपघाताला निमंत्रण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर

देवरुख – संगमेश्वर मार्ग लोवले जवळ धोकादायक बनला आहे. येथील रस्त्याची एक बाजु खचल्याने आगामी काळात येथील वाहतूकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. गेली दोन वर्षे हाच भाग खचत असतानाही बांधकाम विभाग याकडे लक्ष देत नसल्याने वाहन चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या धोकादायक भागा भवती केवळ दगड लावून ठेवण्यात आले आहेत यामुळे येथील धोका आणखीनच वाढला आहे.

देवरुख – संगमेश्वर राज्य मार्ग अत्यंत महत्वाचा असुन तो मुंबई – गोवा महामार्ग आणि रत्नागिरी – कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा एकमेव पर्याय आहे. ३४ किमीच्या या मार्गाचे दुपदरीकरण आणि मजबुतीकऱण यासाठी ३४ कोटिंचा निधी आला आहे. याची निविदा प्रक्रिया सुरु असल्याने या वर्षीही हे काम सुरु झालेले नाही. या कामा अभावी रस्त्याची ठिकठिकाणी दुरवस्था झाली आहे. ऱस्त्याचा खराब झालेला काही भाग नुकताच चांगला करून देण्यात आला मात्र लोवले येथील धोकादायक भागाची डागडुजी करणे बांधकाम विभागाला जमलेले नाही.

ज्या ठिकाणी हा रस्ता खचला आहे त्या ठिकाणी बाजुचा परिसर पाणथळीचा आहे. सोनवी नदिला पूर आल्यास या भागाजवळ मोठे पाणी साचते त्यामुळे खचलेला भाग आणखी ढासळण्याची शक्यता आहे.