हळदीच्या कार्यक्रमाला गेलेल्या डॉक्टरच्या घरात चोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

हळदी समारंभासाठी कुटुंबासह दादर येथे गेलेल्या सुरेश दुआ यांचे घर अज्ञात चोरटय़ाने साफ केल्याची घटना भोईवाडा येथे घडली. चोरटय़ाने दुआ यांच्या घरातील सहा लाखांची रोकड आणि पावणेसहा लाखांचे दागिने असा तब्बल ११ लाख ७६ हजार रु. किमतीचा ऐवज चोरून नेला. व्यवसायाने डॉक्टर असलेले दुआ भोईवाडा येथील ‘मातोश्री प्राइड’ या टॉवरमध्ये १७ व्या मजल्यावर राहतात. शुक्रवारी सायंकाळी ते कुटुंबासह हळदीच्या कार्यक्रमासाठी दादरला गेले होते. रात्री ते घरी परतले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. अज्ञात चोरटय़ाने बनावट चावीने बंद घराच्या दरवाजाचे कुलूप खोलून रोकड आणि दागिने चोरून नेले. याप्रकरणी आर. ए. किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ाविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.