
सामना प्रतिनिधी । मुंबई
माझ्याकडे भरपूर दागिने आहेत. पण मी घरातच कपाटामध्ये दागिने ठेवते, पैसेदेखील भरपूर आहेत असा मैत्रिणीकडे केलेला बडेजावपणा घाटकोपरमधील एका महिलेला चांगलाच महागात पडला. महिलेचा मोठेपणा ऐकून मैत्रिणीची नियत फिरली आणि तिने सर्व माहिती काढून तिच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण घाटकोपर पोलिसांनी गुह्याचा पर्दाफाश करीत चोरीचे सर्व दागिने महिलेला परत मिळवून दिले.
घाटकोपर पश्चिमेकडील गावदेवी रोडवरील बैठय़ा चाळीत रूपाली चौधरी ही विवाहिता राहते. त्याच परिसरात राहणार्या सोनिया जयस्वाल हिच्यासोबत तिची पाच वर्षांपूर्वी मैत्री झाली होती. त्यानंतर सोनियाच रूपालीच्या घरी ये-जा वाढली. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी रूपाली मुलाला घेऊन त्याच्या क्लासमध्ये गेली असताना तिच्या घरात चोरी झाली. बंद लॉक खोलून घरातील कपाटातील साडेसात तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले. याप्रकरणी रूपालीने घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक प्रताप भोसले, पोलीस निरीक्षक विलास दातीर, एपीआय दीप बने तसेच परभळकर, जगदाणे, ठाकरे, पाटील, परब, शैलजा चव्हाण आणि प्रभावती वारघडे या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान रूपालीची मैत्रीण सोनिया हिचे वागणे संशयास्पद वाटल्यामुळे पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. तेव्हा मीच गुन्हा केल्याची कबुली देत तिने एका सराफाला विकलेले सोन्याचे सर्व दागिने पोलिसांनी हस्तगत केले.
- सोनिया नेहमी रूपालीच्या घरी जायची. तेव्हा रूपाली घरातील सर्व बाबी सोनियाला सांगायची. घरात दागिने असल्याचे तिने सांगितले आणि सोनियाची नियत फिरली. सोनियाने एकेदिवशी रूपालीचा मोठेपणा ऐकता तिच्या घराची चावी चोरली. मग त्याच चावीने रूपाली बाहेर गेलेली असताना दरवाजा लॉक खोलून चोरी केली.
- सोनियाला फक्त बंद दरवाजाचे लॉक खोलावे लागले. कपाटातील तिजोरीच्या चाव्या तेथेच होत्या. त्या चावीने तिजोरी खोलून सोनियाने चोरी केली, पण घाईगडबडीत एक अंगठी खाली पडली. नेमकी तिच अंगठी रूपाली घरी परतल्यावर तिच्या नजरेस पडली. अंगठी तिजोरीत ठेवायला गेल्यावर दागिने गायब असल्याचे तिच्या लक्षात आले आणि चोरीचा भंडाफोड झाला.
- रूपालीला तिच्या मुलासाठी क्लास पाहिजे होता. त्यासाठी सोनियाने तिला एका क्लासचा नंबर मिळवून दिला होता. त्याच क्लासच्या सरांना भेटण्यासाठी रूपाली मुलाला घेऊन गेली होती. याचीच संधी साधत सोनियाने चोरी केली होती.




























































