
धनेश पाटील
ड्रम हे वाद्य खरं तर सगळ्या वाद्यवृंदांना आपल्या लयीत गुंफणारं असं महत्त्वाचं आणि तितकंच ताकदीचं वाद्य. थर्टी फर्स्टची नाइट असो वा एखाद्या हॉटेलमधला कार्यक्रम, हिंदीतली गाणी असोत वा इंग्लिशमधलं रॉक आणि पॉप, या साऱयाच ठिकाणी ड्रमवर पडलेल्या लाकडी काठय़ांमुळे घुमलेला नाद सगळ्यांनाच अक्षरशः वेड लावतो. या ड्रमवर अचूक वेळेला योग्य वजनाची थाप पाडून त्यातून एक वेगळाच आवाज काढण्याचं कौशल्य असतं ते ड्रम आर्टिस्टचं. या ड्रम आर्टिस्टच्या वर्तुळातलं दिलीप देसाई हे ज्येष्ठ आणि अत्यंत नावाजलेलं नाव. हिंदी सिनेमा ते इंग्लिश रॉक आणि पॉप हा प्रवास करतानाच नाईक यांनी गेल्या पाच दशकांत हजारो ड्रम आर्टिस्ट घडवलेत हे विशेष.
संगीताशी दिलीप यांची नाळ त्यांच्या अगदी लहानपणीच जोडली गेली. अंदाजे 7-8 वर्षांचे असताना दिलीप यांना तबल्याच्या आवाजानं मंत्रमुग्ध केलं. हे वाद्य शिकावं, ते आत्मसात करावं असं दिलीप यांना वाटत असतानाच त्यांच्या पालकांना संगीत, वाद्य यात फारसा रस नसल्यामूळे दिलीप यांना ते करणं शक्य झालं नाही. मात्र संगीताने झपाटलेल्या दिलीप यांनी हा विरोध झुगारून तबल्याचा अभ्यास करणं, त्याचा सराव करणं हे सुरूच ठेवलं. सुरुवातीला स्वतःच विविध गाणी ऐकून, कोणाकडेही त्याचे शास्त्रीय धडे न गिरवता त्यांनी हा सराव उत्तम केला खरा. मात्र त्याला दिशा मिळाली ते त्यांचे तबला गुरू इंदूलकर सर यांच्यामुळे. मुंबईत वास्तव्यास असलेले देसाई यांनी दादरला इंदूलकर सरांकडे तबल्याचा क्लास लावला आणि इंदूलकर सरांच्या तालमीत देसाई उत्तम तयार झाले. पुढे त्यांनी मुंबईतलं पार्ले गाठलं ते ड्रमच्या शास्त्रशुद्ध अभ्यासासाठी. त्यांचा सुरुवातीला केवळ नोटेशनचा अभ्यास सुरू झाला आणि त्यापुढे फार होऊ शकला नाही. त्यांना शिकवत असलेले गुरू हे तेव्हा दिल्लीला स्थलांतरित झाले आणि देसाई यांच्या पदरी निराशा आली.
तबल्याचा अभ्यास सुरू असतानाच ते एकदा जुहू इथल्या चर्चमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी गेले. इथे आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी प्रत्येकी 25 पैसे तिकिटाची रक्कम गोळा करण्यात आली होती. या जमलेल्या रकमेतून चर्चसाठी फंड उभारला जाणार होता. मात्र या संगीत कार्यक्रमाला ड्रम आर्टिस्टने दांडी मारली. जेव्हा ही बाब देसाई यांच्या मित्रांच्या कानावर पडली तेव्हा त्यांनी देसाई यांना या ड्रमसेटचा ताबा घेण्याची विनंती केली. केवळ नोटेशन माहीत असलेल्या अन् आजवर कधीही ड्रमवर हात न फिरवलेल्या देसाई यांनी या ड्रमचा ताबा घेतला आणि हाच त्यांच्या आयुष्यातला टार्ंनग पॉइंट ठरला. पुढे हा ड्रम त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाला आणि आजही तो आहे, हे वेगळे सांगायला नको.
इंग्लिश रॉकनंतर पॉप संगीतात ते अनेक वर्षे रमले. त्यानंतर त्यांनी हिंदीत श्रीगणेशा केला. संगीत क्षेत्रातल्या तेव्हाच्या आघाडीच्या नावांपैकी बप्पी लाहिरी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल अशा नामवंत लोकांसोबत त्यांनी अनेक सिनेमांसाठी कामे केली. याच काळात सिने म्युझिक असोसिएशनसोबतही काही काळ ते जोडले गेले. या काळात अनेक चढउतार त्यांनी पाहिल्याचं ते सांगतात.
हिंदीत रमल्यानंतर त्यांनी ड्रमर म्हणून वेगळा नावलौकिक मिळवला. याच अनुभवाच्या जोरावर त्यांनी दुबई, अबुधाबी, मस्कत असे नानाविध प्रांतात आपलं ड्रमवरचं कौशल्य दाखवत आपला जगभर वेगळा चाहता वर्ग तयार केला. 1990च्या काळात प्रसिद्धीच्या वेगळ्या शिखरावर पोहोचले असतानाच त्यांच्या घरी अनेक तरुण ड्रम शिकण्यासाठी येत. विनामूल्य शिकवणीची ही सुरुवात त्यांच्या ठाण्याच्या घरी 1990 साली झाली आणि ती अखंड 26 वर्षे पुढे सुरू राहिली. हजारो विद्यार्थी घडवून तरुणांसाठी गुरुकुल ठरलेल्या देसाई सरांना 2016 साली शेवटी हा संगीताचा प्रचार आणि प्रसार थांबवावा लागला. आईची तब्येत खालावली म्हणून त्यांनी हे क्लासेस बंद करून तिच्याकडे आपलं सगळं लक्ष वळवलं.
लाईव्ह कार्यक्रमांत आपली वेगळी कला सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवण्यासाठी भुकेला असलेला सच्चा कलाकार म्हणजे देसाई सर. हाच इतिहास, तेव्हाचा माहौल आणि कार्यक्रमांचा लाईव्ह फील मला छायाचित्रात हवा होता. या फोटोसाठी मी त्यांच्या घरी गेलो. माझ्या सहकाऱयांनी त्यांच्या सर्व वाद्यवृंदाचा सेट लावला. फोटोग्राफीसाठी लागणाऱया लाइटचा सेट असा काही उभा केला की, त्यातून रंगीत लाइट त्यांच्या वाद्यवृंदावर पडेल आणि चेहरा मात्र व्यवस्थित दिसेल याकडे लक्ष दिलं. दहा – पंधरा मिनिटे अवघे आम्ही दिलीप यांना वाजवायला सांगितलं. आजही ड्रमवर पडलेली त्यांची थाप तितकीच वजनदार आणि कानाला तृप्त करणारी ठरली. वाद्यावर अचूक पकड मिळवत आपली कला लीलया सादर करण्यात रमलेल्या देसाई यांचे काही मूड मला यावेळी टिपता आले. कॅमेराबद्ध केलेल्या छायाचित्रात त्यांचा इतिहास नव्याने अवतरल्याची प्रचितीच त्यांना आली. छायाचित्र इतके लाईव्ह आहे की, या छायाचित्राकडे पाहून ते त्यांच्या नेहमीच्याच घरी काढलेत, कोणत्या कार्यक्रमात नाही यावर अनेकांचा विश्वासच बसत नाही.























































