गोआधारित शेतीतून वाढले 25 टक्के उत्पन्न! रोहित पटवर्धन यांचा अभिनव प्रयोग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर तालुक्यातील पोचरी गावातील प्रयोगशील शेतकरी रोहित पटवर्धन यांनी गोआधारित शेतीचा अभिनव प्रयोग करून शेतीतून 25 टक्के उत्पन्न वाढवले आहे. तसेच दुधाचा जोडधंदा करत दोन देशी गाईवरून आता थेट 25 गाईंपर्यंत यशस्वी मजल मारण्याची किमया साधली आहे.

पटवर्धन कुटुंबाचे मूळ गाव संगमेश्वर तालुक्यातील पोचरी हे असले तरी हे सर्व कुटुंब रत्नागिरी शहरात दुग्धव्यवसाय, किराणा आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री अशा विविध व्यवसायांत स्थिर आहेत. यातील रोहित पटवर्धन यांनी वेगळी वाट निवडली. त्यांनी  2015 साली  सखोल अभ्यास करून  पोचरी या मूळ गावी गोआधारित शेती करण्याचा धाडसी निर्णय घेत दोन देशी गाई घेतल्या. गीर जातीच्या गाई घेऊन त्यांच्या गोमूत्र आणि शेणापासून जीवामृत बनवत त्याची फवारणी स्वतःच्या आंबा बागेत केली.

जीवामृत आणि पंचगव्य यांच्या वापरामुळे आंब्याचे थोडे उत्पन्न वाढल्याचा आणि फळांच्या दर्जातही खूपच फरक पडल्याचा अनुभव रोहित यांना आला. दोन्ही गाईंना केवळ गोशाळेत बांधून न ठेवता दिवसा मोकळ्या वातावरणात सोडल्याने  सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे त्या अधिक तंदुरुस्त राहतात. परिणामी दोन्ही गाई सुरुवातीपेक्षा जास्त दूध देऊ लागल्या. यामुळे खूप फरक पडला.

जीवामृत आणि पंचगव्याचा प्रयोग करून अनेक बागायतदारांनी तसेच शेतकऱयांनीही उत्पादन घ्यावे. गोआधारित शेतीचा प्रयोग करून उत्पादन वाढवावे असे आवाहन रोहित यांनी केले आहे.

गाईंची संख्या वाढल्यामुळे जीवामृत आणि पंचगव्याची निर्मितीअधिकाधिक होऊ लागली आणि संपूर्ण आंबा बागेला याचा फवारणी तसेच खत म्हणून उपयोग होऊ लागला. आंबा बागेचे उत्पन्न  थेट 25 टक्क्यांनी वाढले. याबरोबरच पंचगव्याच्या वापरामुळे हापूसचा दर्जा आणि स्वाददेखील कमालीचा वाढला. हापूस आंबा खाल्ल्यानंतर हाताचा गंधदेखील खूप वेळ टिकून राहतो, असा अनुभव आल्याचे रोहित पटवर्धन यांनी सांगितले.

जीवामृत आणि पंचगव्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांनी हळूहळू देशी गाईंची संख्या वाढवली. ती आता थेट 25 वर पोहोचली आहे. गेल्या सात वर्षांच्या प्रयोगातून  रोहित यांनी अनेक अनुभव घेतले आणि आता त्यांच्याकडील गाई थेट 18 लिटरपर्यंत दूध देऊ लागल्या आहेत.