
पुणे, पिंपर चिंचवडमधील वाहतूककोंडी ही अत्यंत गंभीर समस्या बनत चालली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पिंपरी चिंचवडमधील पुनावळे भागातील वाहतूककोंडीचा व्हिडीओ शेअर करत सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. तसेच ”वाहतूक कोंडीचे जबर किंमत इथला युवा आणि स्थानिकांना मोजावी लागेल”, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
”हा व्हिडिओ एखाद्या पार्किंगचा नाही तर तो आहे पिंपरी-चिंचवडमधील पुनावळे भागातील. हिंजवडी IT पार्कमध्ये काम करणारे हजारो IT Professionals या आणि आसपासच्या भागात राहतात. याच भागातील विविध IT कंपन्यांमुळे स्थानिकांना रोजगार मिळाला, मात्र गेल्या काही वर्षांपासून हा भाग पूर्णतः वाहतूक कोंडीत अडकलाय. परिणामी अनेक कंपन्यांनी स्थलांतर केलं असून काही कंपन्या स्थलांतराच्या मार्गावर आहेत. या वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर स्थानिकांना रोजगार देणाऱ्या आणि इथल्या आर्थिक प्रगतीला चालना देणाऱ्या अनेक कंपन्या बाहेर जातील आणि त्याची जबर किंमत इथला युवा आणि स्थानिकांना मोजावी लागेल. त्यामुळं सरकारने प्राधान्याने ही वाहतूक कोंडी सोडवावी”, असे रोहित पवार यांनी X वरील पोस्टमधून म्हटले आहे.


























































