
सामना ऑनलाईन । मुंबई
हिंदुस्थानी क्रिकेट संघातील हिटमॅन आणि मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमधील (टी-२०) उप कर्णधार रोहित शर्मा सध्या दोन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी आयर्लंड दौऱ्यावर आहे. २७ आणि २९ जूनला हे दोन सामने खेळले जाणार आहे. या मालिकेसाठी आयर्लंडमध्ये दाखल झाल्यावर रोहित शर्माला ११ वर्षापूर्वीचा दिवस आठवला.
आयर्लंडच्या भूमिवरच रोहितने पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना निळी जर्सी घातली होती. बरोबर अकरा वर्षापूर्वी म्हणजे २३ जून २००७ ला बेलफेस्टमध्ये आयर्लंडविरुद्ध एक दिवसीय क्रिकेटची सुरुवात केली होती. आयर्लंडमधील तो दिवस आठवून रोहित भावूक झाला आणि इन्स्टाग्रामवर आपल्या पहिल्या एक दिवसीय सामन्यातील पदार्पणाचा फोटो शेअर केला.
रोहितने हॅशटॅग आयर्लंड असे लिहिले असून आजच्याच दिवशी त्या वर्षी (२००७) मी हिंदुस्थानी क्रिकेट संघाकडून खेळताना पदार्पण केले होते आणि आज पुन्हा एकदा त्याच ठिकाणी आलो आहे, ज्या ठिकाणी सर्वकाही सुरू झाला होते, असे कॅप्शन त्याने दिले आहे. या सामन्यात रोहितला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. हिंदुस्थानने हा सामना ९ विकेट्सने जिंकला होता. परंतु निळी जर्सी घालून मैदानात उतरण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याने रोहित चांगलाच खूष होता.



























































