
हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात आजपासून लीड्समध्ये तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. पहिला सामना अनिर्णित राहिल्यानंतर हिंदुस्थानने दुसऱ्या कसोटी लढतीत यजमान संघाचा दारूण पराभव केला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
लीड्समध्ये सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेण्याचा प्रयत्न विराटसेनेचा असणार आहे. याच कसोटीमध्ये सलामीवीर खेळाडू रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना हिंदुस्थानचे दिग्गज खेळाडू कपिलदेव यांचा विक्रम मोडण्याची संधी आहे.
एक षटकार आणि रोहित चौथ्या स्थानी
कसोटी क्रिकेटमध्ये हिंदुस्थानकडून सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्यांच्या यादीत रोहित शर्मा सध्या पाचव्या स्थानी आहे. लीड्स कसोटीमध्ये एक षटकार ठोकताच तो कपिल देव यांचा विक्रम मोडेल आणि चौथ्या स्थानी येईल. कपिल देव यांच्या नावावर 131 कसोटीत 61 षटकारांची नोंद आहे, तर रोहितच्या नावावरही 41 कसोटीत 61 षटकार आहेत. पहिल्या स्थानावर विरेंद्र सेहवाग, दुसऱ्या स्थानावर महेंद्रसिंह धोनी आणि तिसऱ्या स्थानावर सचिन तेंडुलकर विराजमान आहे.
बुमराहला वेगवान ‘शतक’ करण्याची संधी
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. नॉटिंगहॅम कसोटीत बुमराहने 9 बळी घेतले होते, तर लॉर्डस कसोटीत 3 बळी घेतले होते. आता लीड्स कसोटीमध्ये आणखी 5 बळी घेताच कसोटी क्रिकेटमध्ये हिंदुस्थानकडून सर्वाधिक वेगवान शंभर बळी घेण्याचा विक्रम करण्याची संधी बुमराहकडे आहे. हिंदुस्थानकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान गतीने शंभर बळींचा विक्रम कपिल देव यांच्या नावावर असून त्यांनी 25 कसोटीमध्ये अशी कामगिरी केली होती. सध्या बुमराहच्या नावावर 22 कसोटीमध्ये 95 बळींची नोंद असून लीड्समध्ये त्याला कपिल देव यांचा विक्रम मोडण्याची नामी संधी आहे.
हिंदुस्थानकडून कसोटीत सर्वाधिक षटकार ठोकणार खेळाडू
1. विरेंद्र सेहवाग – 90 षटकार
2. महेंद्रसिंह धोनी – 78 षटकार
3. सचिन तेंडुलकर – 69 षटकार
4. कपिल देव – 61 षटकार
5. रोहित शर्मा – 61 षटकार
6. सौरव गांगुली – 57 षटकार



























































