
वन डे वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा अद्भुत खेळला हे अवघ्या जगाने पाहिलेय. तो हिंदुस्थानी क्रिकेटचा अविभाज्य अंग आहे आणि आगामी टी-20 वर्ल्ड कपमध्येही तोच कर्णधार असेल, असा दृढविश्वास हिंदुस्थानचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने बोलून दाखवला.
येत्या जून महिन्यात कॅरेबियन बेट आणि अमेरिकेत टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून सध्या हिंदुस्थानी संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळतोय आणि आठ दिवसांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धही तीन सामन्यांची टी-20 मालिकाही खेळणार आहे. पण रोहितने या दोन्ही मालिकांमधून स्वतःला दूर ठेवले आहे.
पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये रोहित आणि विराटने खेळावे, अशी समस्त हिंदुस्थानींची अपेक्षा आहे. विशेष करून आगामी टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळावे. चाहत्यांप्रमाणे गौतम गंभीर, वसीम अक्रमसारख्या दिग्गजांनीही रोहित आणि विराटने टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळावे, असा आग्रह धरला आहे. आता तोच आग्रह सौरभ गांगुलीनेही व्यक्त केला आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने सलग दहा विजयांसह अंतिम फेरीत धडक मारली होती, पण जगज्जेतेपदाच्या लढाईत ते हरले. रोहित आणि विराट महिनाभर क्रिकेटपासून दूर असतील. त्यांना विश्रांतीची गरजही आहे. कारण नववर्षापासून ते खूपच व्यस्त असतील. रोहितने सर्व फॉरमॅटमध्ये परतायला हवे आणि संघाचे नेतृत्वही करायला हवे, असे स्पष्ट मत गांगुलीने व्यक्त केले.
रोहित ज्या फॉर्मात आहे, त्याने किमान जूनपर्यंत टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळावे आणि संघाचे कर्णधारपदही सांभाळावे, असा सल्ला गांगुलीने थेट दिला आहे. गेल्या 13 महिन्यांपासून रोहित आणि विराट एकही टी-20 सामना खेळलेला नाही. त्यानंतर हार्दिक पंडय़ाकडे टी-20 चे कर्णधारपद सोपविण्यात आले होते. आता पंडय़ाच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव नेतृत्व करतोय. वर्ल्ड कप ही स्पर्धा कधीही द्विपक्षीय मालिकेपेक्षा वेगळी असते आणि त्याचा दबावही वेगळा असतो. हिंदुस्थानने वर्ल्ड कपमध्ये अफलातून कामगिरी केलीय आणि जूनमध्येही त्या कामगिरीची पुनरावृत्ती होणार आहे. रोहित एक लीडर आहे आणि तोच टी-20 वर्ल्ड कपचा कर्णधार असेल, असेही गांगुली म्हणाला.
आता जगज्जेतेच
जरी हिंदुस्थानी संघ जगज्जेतेपद पटकावण्यात अपयशी ठरला असला तरी वन डे वर्ल्ड कप हिंदुस्थानचाच संघ सर्वोत्तम होता. याच संघाला पुन्हा सात महिन्यांनंतर आणखी एक वर्ल्ड कप खेळण्याची संधी मिळतेय. विश्वास आहे यावेळी उपविजेते नव्हे तर जगज्जेते ठरू, असेही गांगुली विश्वासाने बोलला.
रोहित-विराट खेळणार
रोहित आणि विराटने गेले वर्षभर टी-20 क्रिकेटपासून स्वतःला दूर ठेवले आहे. गेल्यावर्षीचे अपयशही त्याच्या पचनी पडले नव्हते. तेव्हापासून ते टी-20 पासून दूर आहेत. पण आपल्या पांढऱ्या चेंडूच्या कारकीर्दीचा शेवट ‘न भूतो न भविष्यति’ करण्याच्या निर्धाराने दोघेही टी-20 वर्ल्ड कप खेळतील, असा कट्टर क्रिकेटप्रेमींनाच विश्वास नाही तर क्रिकेटच्या दिग्गजांचेही असेच मत आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या आधी आयपीएलचा संग्राम रंगणार आहे आणि या लीगमध्ये रोहित आणि विराट जीव तोडून खेळणारच आहेत. त्यांचा या लीगमधला सहभाग टी-20 वर्ल्ड कपची तयारीच असेल. त्यामुळे दोघे स्वतःला कितीही दूर ठेवत असले तरी ते जूनमध्ये अमेरिका-विंडीजमध्ये टी-20 वर्ल्ड कप खेळायला उतरतील आणि हिंदुस्थानचे 17 वर्षांची जगज्जेतेपदाची प्रतीक्षाही संपुष्टात आणतील, असा विश्वास सारेच व्यक्त करीत आहे. कारण या दोघांशिवाय हिंदुस्थानी संघाला पर्यायच नाही. दोघांनाही हा टी-20 वर्ल्ड कप खेळायचाच आहे. त्यामुळे दोघांनीही गेल्या वर्षभरात टी-20 सामन्यांच्या अनुपस्थितीनंतर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. त्यांचे हे मौनच सांगतेय की, ते टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार. एवढेच नव्हे तर निवड समितीचीही याबाबतीत चर्चा झाली असल्याचा अंदाज आहे. उद्या जरी दोघांचे मन बदलले तर निवड समितीच नव्हे तर बीसीसीआय या दोघांना टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचा आग्रह करतील. गळही घालतील, असाही आगळा विश्वास हिंदुस्थानी चाहत्यांनी बोलून दाखवला आहे.






























































