रोखठोक – के.सी.आर. यांचेही ‘मिंधे’ मॉडेल, महाराष्ट्रात पैशांचा नवा खेळ

महाराष्ट्राच्या राजकारणात तेलंगाणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी त्यांचा ताफा घुसवला आहे. कालपर्यंत हेच के.सी.आर घोर भाजपविरोधी म्हणून उभे होते. मोदी यांच्या विरोधात वज्रमूठ उभी करण्यासाठी ते देशात फिरले. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे व शरद पवार यांना भेटून गेले. त्याच महाशयांनी आता ‘यू टर्न घेतला आहे. ते महाराष्ट्रात घुसत आहे ते भाजपच्या मदतीसाठीच!

महाराष्ट्राचे राजकारण हा एकेकाळी पुरोगामी विचारांचा भुईकोट किल्ला होता. बाहेरच्या विचारांचे कीटक येथे घुसत नव्हते. आता महाराष्ट्राची अवस्था कोसळत चाललेल्या किल्ल्यासारखी झाली आहे. अमित शहांपासून तेलंगणाच्या के. चंद्रशेखर रावांपर्यंत जो उठतोय तो महाराष्ट्राचे सत्ताकारण व अर्थकारण ताब्यात घेऊ इच्छितो. मऱ्हाठी राज्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या पक्षविस्तारासाठी महाराष्ट्राची भूमी निवडली. मराठवाडा, विदर्भ, प. महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाची मोठय़ा प्रमाणात प्रसिद्धी मोहीम राबवली जात आहे. पैशांच्या बाबतीत ते महाराष्ट्रातील शिंदे गट व भाजपास टक्कर देत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी एक विधान केले, ‘चंद्रशेखर राव यांनी आपल्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची ‘ऑफर’ दिली आहे!’ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोणी यायचे हे आता श्री. राव ठरवू लागले. प्रकाश आंबेडकर व राव यांच्यातही भेटीगाठी झाल्या. महाराष्ट्रातील अडगळीत गेलेले अनेक जण के. सी. आर. यांच्या पक्षात सामील झाले. के. सी. आर. चार दिवसांपूर्वी तेलंगणातून 600 गाडय़ांचा ताफा घेऊन महाराष्ट्रात आले. पंढरपुरात त्यांनी श्री विठोबा माऊलीचे दर्शन घेतले. पंढरपूरचे एक तरुण नेते भालके यांनी के. सी. आर. यांच्या पक्षात प्रवेश केला. त्या कार्यक्रमात राव यांनी जे भाषण केले ते तेलंगणातील शेतकऱ्यांच्या सुखसमृद्धीचे वर्णन करणारे होते. जे तेलंगणास जमले ते महाराष्ट्राला का जमू नये? असा सवाल त्यांनी केला!

‘वर्षा’वर बैठक!

मुख्यमंत्रीपदी श्री. उद्धव ठाकरे असताना तेलंगणाचे मुख्यमंत्री श्री. के. सी. आर. हे ‘वर्षा’ बंगल्यावर आले होते व त्यांनी श्री. ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. वर्षा बंगल्याच्या हिरवळीवर राव व त्यांच्या सहकाऱ्यांसाठी भोजन व्यवस्था होती. राव यांनी तेव्हा तेलंगणातील शेतकऱ्यांची स्थिती आपण कशी सुधारली त्या योजनांची माहिती दिली. पीक विमा योजनेपासून इतर सर्व योजना त्यांनी सांगितल्या. देशातील सर्व प्रमुख पक्षांनी मोदी यांच्या एकाधिकारशाहीविरुद्ध एकत्र आले पाहिजे व त्याची सुरुवात महाराष्ट्रातून व्हावी म्हणून आपण येथे आलो, असे ते त्यावेळी म्हणाले होते. आपल्याला कोणतीही मोठी महत्त्वाकांक्षा नाही, पण 2024 साली दिल्लीत परिवर्तन व्हावे यासाठी आपण देशात फिरू, असेदेखील ते म्हणाले होते आणि त्यांच्या बोलण्यात प्रामाणिकपणा होता. राव हे महाराष्ट्र भेटीत शरद पवार यांना भेटले. पुढच्या काळात ते नितीशकुमार, केजरीवाल, ममता बॅनर्जी यांनाही भेटले. पण त्यावेळी विरोधी आघाडीसाठी शड्डू ठोकून उभे राहणारे के. सी. आर. आज दुसऱ्या टोकाला उभे आहेत व अप्रत्यक्षपणे ते मोदी यांनाच मदत करीत आहेत.

राष्ट्रीय पक्ष का?

तेलंगणा राष्ट्र समिती हा राव यांचा मूळ प्रादेशिक पक्ष. राव यांनी त्याचे रूपांतर भारत राष्ट्र समिती या पक्षात केले. कारण राष्ट्रीय राजकारणात त्यांना उतरायचे आहे. हे त्यांनी का करावे? हे रहस्यच आहे. तेलंगणात लोकसभेच्या 11 जागा आहेत. राव यांच्या पक्षाने त्या सर्व जागा जिंकल्या तरी राष्ट्रीय राजकारणात त्यांचे वजन वाढेल, पण तेलंगणा वाऱ्यावर सोडून राव महाराष्ट्रात घुसले. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्र दिवसेंदिवस कठीण जाताना दिसत आहे. एकनाथ शिंदे गटाचे ओझे म्हणजे खांद्यावर खेचरे घेऊन फिरण्यासारखीच अवघड अवस्था. भाजप सध्या महाराष्ट्रात त्याच अवस्थेतून जात आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा तीन पक्षांची महाविकास आघाडी लोकसभेच्या 48 पैकी किमान 38 ते 40 जागा जिंकेल व विधानसभेच्या 170-175 जागांवर विजयी होईल. या मजबूत स्थितीला तडा देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने ‘के.सी.आर.’ यांना महाराष्ट्रात घुसवले हे आता उघड होऊ लागले. राव यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात पैशांचा पाऊस पाडायला सुरुवात केली व त्या पावसात भिजण्यासाठी अनेक जण डोळय़ांच्या छत्र्या बंद करून त्यांच्या पक्षात गेले. उद्या महाराष्ट्रात के. सी. आर. यांचा पक्ष, ओवेसी व अन्य लहान पक्षांची नवी आघाडी निर्माण झाली तरी आश्चर्य वाटणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात पैशांचे धरण फुटले आहे व लोकांना जणू तेच हवे आहे.

चित्र खरे नाही

के. सी. आर. तेलंगणातील शेतकऱ्यांच्या सुबत्तेचे जे चित्र महाराष्ट्रात निर्माण करीत आहेत ते तितकेसे खरे नाही. तेलंगणा राज्याची आर्थिक स्थिती घसरली आहे. तेलंगणात गेल्या काही महिन्यांत 60 हून जास्त सरपंचांनी आत्महत्या केल्या. के. सी. आर. सरकारने विकासकामे करण्यासाठी ग्रामपंचायतींवर दबाव आणला. अनेक सरपंचांनी वैयक्तिक कर्जे काढून ही विकासकामे पुढे रेटली. पण नंतर या सरपंचांची बिलेच मंजूर झाली नाहीत व कर्जबाजारी सरपंचांवर आत्महत्या करण्याची वेळ आली. पंचायत राजसाठी केंद्राने पाठवलेला 35 हजार कोटींचा निधी तेलंगणा सरकारने राज्याच्या इतर कामांकडे वळवल्याने ग्रामपंचायती कंगाल झाल्या व सरपंचांवर उपासमार व आत्महत्येची वेळ आली. काही सरपंचांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून ‘कारुण्य मरणम्’ म्हणजे दयामृत्यूची मागणी केली. तेलंगणा राज्यात जगणे कठीण झाल्याची वेदना त्यांनी न्यायालयात मांडली. तेलंगणाचे सरकार आणि के. सी. आर. यांच्या पक्षाचे लोक ग्रामपंचायतीवर दबाव टाकून कामे करायला लावतात. सरकारच्या अनेक योजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवण्यासाठी जोर लावतात, पण झालेल्या खर्चाची बिलेही मंजूर करीत नाहीत. ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे पगार  भरायलाही पैसे राहत नाहीत व शेवटी सरपंचाला सावकारांकडून कर्ज काढून ग्रामपंचायत चालवावी लागते. याच आर्थिक ओझ्यामुळे अनेक सरपंचांनी आत्महत्या केल्या. कलेक्टर व तहसीलदारांच्या दारात जाऊन आत्महत्या करण्याचे प्रकारही घडले. तेच तेलंगणा सरकार त्यांचे ‘मॉडेल’ घेऊन महाराष्ट्रात आले आहे याचे आश्चर्य वाटते.

पैसा येतो कोठून?

दिल्ली सरकारच्या मद्य घोटाळय़ाचे धागेदोरे तेलंगणातील ‘लिकर माफिया’पर्यंत पोहोचले व त्यात के. सी. आर. यांच्या कन्या कविता यांना ‘ईडी’ने चौकशीसाठी बोलावले. तेव्हापासून के. चंद्रशेखर राव हे थंड पडले व त्यांनी मूळ भूमिकेपासून ‘यू टर्न’ घेतला. भारतीय जनता पक्ष व मोदी यांच्या कारभारावर टिप्पणी करणे त्यांनी बंद केले. आता त्यांनी काँग्रेसला आपला शत्रू ठरवले आहे. महाराष्ट्रात त्यांनी पक्षविस्ताराचा कार्यक्रम सुरू केला आहे तो भाजपास मदत व्हावी म्हणून. त्यासाठी प्रचंड पैसा ते ओतत आहेत. हा पैसा कोठून येतो? वाय. एस. आर. तेलंगणा पक्षाच्या अध्यक्षा शर्मिला यांनी सांगितले, ‘भ्रष्ट मार्गाने पैसा गोळा केला जात आहे. कलेश्वरम् लिफ्ट पाटबंधारे योजना हा देशातील सगळय़ात मोठा घोटाळा असून किमान 70 हजार कोटी रुपयांची या योजनेत लूट झाली असून भाजप व केंद्र सरकारने यावर मौन बाळगले आहे. कलेश्वरम् पाटबंधारे योजनेचा खर्च कसा वाढवला गेला व त्यातला ‘टक्का’ कोठे वळवला हे उघड रहस्य आहे. हाच टक्का महाराष्ट्रात वळवून भाजपच्या मदतीसाठी वापरला जात आहे. शिंदे व के.सी.आर. यांच्या कार्यपद्धतीत हे असे साम्य आहे. मोदी यांनी भोपाळमध्ये भाषण केले. पाटण्यात जमलेल्या विरोधकांचे एकत्रित घोटाळे वीस लाख कोटींचे आहेत असे ते म्हणाले. या वीस लाख कोटींत त्यांनी तेलंगणा व महाराष्ट्रात शिंद्यांचे घोटाळे पकडले नसतील. कारण या रकमा भाजपच्या जमेच्या बाजूस टाकल्या गेल्या आहेत. तेलंगणा मॉडेल महाराष्ट्रात घेऊन येणारे के. सी. आर. हे संघर्षातून पुढे आलेले नेतृत्व. त्यांच्या कर्तबगारीविषयी, राज्य चालवण्याच्या क्षमतेविषयी शंका घेण्याचे कारण नाही. ते महाराष्ट्रात आले म्हणून अस्वस्थ होण्याचेही कारण नाही, पण आधीच बिघडत चाललेल्या महाराष्ट्राला जास्त बिघडवण्यास ते हातभार लावीत आहेत. पैशांचे राजकारण हे वेश्येचे राजकारण असते, असे दादा धर्माधिकारी म्हणाले होते. के. सी. आर. यांनी हे सर्व टाळायला हवे. राष्ट्रीय राजकारणात येण्याची त्यांची दिशा चुकली आहे.

Twitter – @rautsanjay61
Email – [email protected]