
सामना ऑनलाईन । संगमेश्वर
बचतगटातील महिला फक्त पापड, लोणचं, भाजीपाला व मसाले एवढेच उद्योग न करता आता बचत गटाच्या महिलांनी वनऔषधी वनस्पतीकडे मोर्चा वळविला आहे . मुंबई गोवा महामार्गावरील आरवली नजीकच्या खेरशेत येथील रूचिरा स्वयंसहाय्यता समूहाने ‘ आरारूट ‘ बहुगुणी औषधी वनस्पतीच्या रोपांची लागवड करून वनौषधी लागवडीला प्राधान्य दिले आहे.
पूर्वी वैद्यकीय सेवा प्रगत नसल्याने ‘ आजीचा बटवा ‘ व त्यातील घरगुती औषधांचा वापर करण्यात येत होता. आयुर्वेदातील उपचार हा निरोगी आयुष्याचा पाया होता. मात्र, आता बदलत्या काळानुसार आयुर्वेद मागे पडून ॲलोपॅथिक उपचार सुरू झाले. त्यामुळे नव्या पिढला वनौषधी वनस्पतींची माहिती व त्यांचे महत्व समजलेले नाही. आता पुन्हा वनौषधी वनस्पतींचे जतन करण्याचे प्रयत्न शासनाकडून केले जात आहे . अनेक ठिकाणी वनऔषधी वनस्पतींची लागवड केली जात आहे. बचतगटातील महिलाही औषधी वनस्पतींचे महत्त्व लक्षात घेऊन वनौषधी रोपांच्या लागवडीकडे वळल्या आहेत. असाच प्रयत्न खेरशेत येथील रूचिरा स्वयंसहाय्यता महिला समूहाने केला असून त्यांनी बहुगणी औषधी ‘ आरारूट ‘ या वनौषधी वनस्पतीच्या रोपांची लागवड केली आहे. मुंबई- गोवा महामार्गावरील आरवली नजीकचे खेरशेत गावात ‘ रूचिरा ‘ स्वयंसहाय्यता महिला समुहाची स्थापना 21 डिसेंबर 2018 रोजी करण्यात आली . या समुहात 12 सदस्य महिला आहेत. सुमहातील महिलांनी व्यवसाय करण्याचे ठरविल्यावर तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेतले. त्यानंतर फिरत्या निधीतून त्यांनी अगरबत्ती तयार करण्याची मशिन खरेदी केली. त्यांनी तयार केलेल्या अगरबत्ती अत्यंत सुवासिक असल्याने ग्राहकांची त्यांना पसंती मिळाली. यातून गटाला चांगले उत्पन्न मिळाले. त्यानंतर रूचिरा समुहातील महिलांनी वेगळा प्रयोग करण्याचे ठरविले. त्यानुसार वनौषधी वनस्पती असणाऱ्या ‘ आरारूट ‘ या वनस्पतींची लागवड करण्याचा निर्णय घेतला . एक गुंठे क्षेत्रावर महिलांनी सुमारे 600 आरारूट रोपांची लागवड केली . आरारूटचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे महिलांनी आरारूटची लागवड केली. तसेच याला भावही चांगला मिळतो. साधारणतः 500 ते 600 रूपये एवढा एक किलोचा दर आहे . त्यामुळे महिलांनी केलेली लागवड आर्थिक स्त्रोत निर्माण करणारी ठरली आहे .
आरारूटची लागवड खेरशेत येथील रूचिरा समुहाला फायदेशीर ठरत आहे . बचतगटातून साकारलेली वनौषधी लागवड पुढे जाऊन आयुर्वेदाला पुन्हा चालना देणारी ठरणार आहे . यामुळे गावठी औषधी वनस्पतींचे ओळख नव्या पिढीला होणार आहे . जंगलातील औषधी वनस्पतींचा संग्रह असलेला ‘ आजीचा बटवा ‘ पुन्हा बचतगटातून प्रसिध्दीस येऊ शकतो. आरारूटची रोपे विकून महिलांनी उत्तम नफा प्राप्त केला आहे . त्यामुळे कुटुंबातील आर्थिक चणचण दूर होत आहे. बचतगटातून आता महिला वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करताना स्वतःमधील कल्पनाशक्तीला वाव देत आहेत . रूचिरा समुहाची ही नवीन संकल्पना कौतुकास्पद ठरत आहे.





























































