
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोनाच्या ‘सिंगापूर व्हेरिंएट’बाबत केलेल्या ट्विटवरून बुधवारी नवा वाद उफाळला. त्यांच्या ट्विटवर सिंगापूरने तीव्र आक्षेप घेतला. त्यावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केजरीवालांना सुनावत सिंगापूरची मनधरणी केली. केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचे मत म्हणजे हिंदुस्थानचे मत नाही, असे ट्विट जयशंकर यांनी केले.
सिंगापूरमधील कोरोनाचा नवा स्ट्रेन लहान मुलांसाठी घातक आहे. या स्ट्रेनबाबत देशात खबरदारी घेण्याच्या दृष्टीने केजरीवाल यांनी मंगळवारी ट्विट केले होते. केंद्राने सिंगापूरची सर्व विमाने रद्द करावीत, अशी मागणी त्यांनी केली होती. त्याच्या ट्विटवर सिंगापूरच्या दूतावासाने तीव्र नाराजी व्यक्त केली. सिंगापूरमध्ये नवा स्ट्रेन आढळून आल्याच्या दाव्यात काहीही तथ्य नसल्याचे दूतावासाने सांगितले. हा सगळा प्रकार निदर्शनास आल्यानंतर लगेचच परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी ट्विट करीत हिंदुस्थानची अधिकृत भूमिका मांडली. केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचे मत हिंदुस्थानचे मत नाही, असे स्पष्टीकरण जयशंकर यांनी दिले. याचवेळी त्यांनी केजरीवालांची कानउघाडणी केली. कोरोना लढय़ात सिंगापूर व हिंदुस्थानचे अतिशय चांगले संबंध आहेत. सिंगापूरने हिंदुस्थानला सर्वतोपरी मदत केली आहे. याबाबत ज्यांना पुरेशी माहिती असायला हवी होती, त्यांच्याकडून आलेले बेजबाबदार वक्तव्य दीर्घकाळ चालत आलेले द्विपक्षीय संबंध बिघडवू शकतात, असे खरमरीत ट्विट करीत जयशंकर यांनी केजरीवालांना टोला लगावला.
























































