
औरंगजेबाने आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अटक केल्याचे वृत्त धडकताच संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात व चिंतेत बुडाला होता, पण महाराजांच्या अटकेनेही आनंद मानून, गोडधोड वाटणारा एक वर्ग तेव्हाही महाराष्ट्रात होताच. त्याच प्रवृत्तीचे लोक बेळगाव महापालिका निवडणुकीतील मराठी पराभवाचा आनंद साजरा करीत आहेत. मराठीजनांचे शाप व हुतात्म्यांचे तळतळाट त्यांना लागतील. सीमा बांधवांचा लढा सुरूच राहील, मराठी एकजूट पुन्हा उसळून समोर येईल! बेळगावच्या पराभवातून एक धडा घ्यावाच लागेल. आपले शत्रू आणि वैरी आपल्याच घरात आहेत. एकीची वज्रमूठ सुटली की गद्दारांचे फावते!
मराठी माणूसच मराठी माणसाचा सगळय़ात मोठा शत्रू आहे काय? असा प्रश्न बेळगाव महापालिका निकालानंतर निर्माण झाला आहे. मराठी एकजूट व मऱहाटी लढ्याचा बेळगावात दारुण पराभव झाल्याचा धक्का सगळय़ांनाच बसला आहे, पण बेळगावात मराठी माणसांचा पराभव घडताच महाराष्ट्रातील मऱहाटी भाजप पुढाऱयांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. हे दुःख टोचणारे आहे. त्यांना या पराभवाने जणू हर्षवायूच झाला. मराठी माणूस संयुक्त महाराष्ट्र लढय़ाच्या कर्मभूमीत पराभूत झाला म्हणून महाराष्ट्रात फटाके वाजवले गेले, हे जास्त वेदनादायक आहे. क्रिकेटच्या सामन्यात पाकिस्तान जिंकताच भेंडीबाजारातील काही भागात पूर्वी फटाके फुटत होते. तसलेच दळभद्री कृत्य बेळगावच्या निकालाने घडले आहे. संपूर्ण कर्नाटक आणि महाराष्ट्राचे लक्ष बेळगावच्या निवडणुकीकडे लागले होते. गेली किमान 40 वर्षे तरी बेळगाव महानगरपालिकेच्या मराठी एकजुटीचा म्हणजे छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा फडकत होता. महापालिकेत महाराष्ट्र एकीकरण समितीचे बहुमत येतच असे. महापौर व उपमहापौर निवडून येत होते. बेळगावात ‘जय हिंद’बरोबरच ‘जय महाराष्ट्र’चा गजर घुमत होता. बेळगावसह संपूर्ण लढय़ाचे व संघर्षाचे प्रतीक म्हणून बेळगाव महानगरपालिकेवरील भगव्याकडे आदराने पाहिले जात होते. याच भगव्यासाठी सीमाभागातील अनेक पिढय़ांनी हौतात्म्य पत्करले. पोलिसी अत्याचार सहन केले. मराठी आमची मायभाषा. महाराष्ट्रात आम्हाला येऊद्या, असा आक्रोश करणाऱया मराठी बांधवांनी तेथे भगव्यासाठी ज्या खस्ता खाल्ल्या त्याची नोंद कुणाला पुसता येणार नाही. तो भगवा एकदा उतरवणारच, असे कानडी राज्यकर्त्यांचे स्वप्न होते. कानडी राज्यकर्त्यांनी हा भगवा जोरजबरदस्तीने तर उतरवलाच, पण मराठी माणसांचे बहुमत असलेली महापालिकाही सूडाने बरखास्त केली. त्यानंतर आठ वर्षे महापालिकेवर प्रशासक नेमून राज्य करण्यात आले व आताही मराठी
एकजुटीची कोंडी करण्यासाठी
कोरोना काळात घाईघाईने निवडणुकीचा कार्यक्रम उरकून घेतला. एकीकरण समितीने वॉर्ड रचनेवर आक्षेप घेतला, म्हणजे मराठी लोकवस्तीचे बालेकिल्ले असे काही फोडले की मराठी एकजुटीचा विजय होऊच नये. प्रचारात सहभागी होणाऱया कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल झाले. अनेक बुथवर ईव्हीएममधून कागदी स्लिपच बाहेर येत नव्हती. हे सर्व समोर आणूनही कर्नाटक प्रशासनाने निवडणूक जोरजबरदस्तीने रेटून नेली व मराठी माणसांचा पराभव घडवून आणला. भाजपास पूर्ण बहुमत मिळाले व महाराष्ट्र एकीकरण समितीस पाच जागाही जिंकता आल्या नाहीत. याचा आनंद महाराष्ट्राला होऊच शकत नाही. बेळगाव महानगरपालिकेवरील भगवा उतरवून पालिका बरखास्त केली तेव्हा साधा निषेधही न करणारे भाजपचे महाराष्ट्रातील पुढारी आज ‘भगवा फडकला हो।़।़’ म्हणून हर्षवायूने बेभान होत गोडधोड वाटत फिरत असतील तर संयुक्त महाराष्ट्राच्या 105 हुतात्म्यांचा तो अपमान आहे. लोकसभा पोटनिवडणुकीत एकीकरण समितीचे शुभम शेळके यांना सवा लाख मते मिळाली होती. हे लक्षण चांगलेच होते, पण एकीकरण समितीच्या उमेदवाराचा पराभव घडावा यासाठी महाराष्ट्रातील भाजप पुढाऱयांची कुमक बेळगावात डेरेदाखल झाली होती. त्यामुळे आज बेळगावातील मराठीजनांच्या पराभवाबद्दल येथील भाजपचे पुढारी बेभान झाले याबद्दल आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. अखंड महाराष्ट्राबाबत यांना आस्था नव्हती आणि नाहीच. बेळगावात शिवसेना कधीच लढली नाही. सीमा आंदोलनात सहभागी असलेले शरद पवारही कधी बेळगाव निवडणुकीच्या आखाडय़ात उतरले नाहीत. महाराष्ट्रातील काँग्रेसचे पुढारीही कधी सीमा बांधवांशी बेईमानी करताना आढळले नाहीत. प्रत्येकाने आपापल्या परीने सीमाभागातील
मराठी बांधवांना बळ
देण्याचेच प्रयत्न केले, पण बेळगावसह सीमाभागातील मराठी बांधवांची ती एकजूट आज उरली आहे काय? महाराष्ट्र एकीकरण समितीस तडे गेले. गट-तट निर्माण झाले. लढय़ातील काहीजण तर कर्नाटक सरकारच्या चाकरीत व गुलामीतच धन्य धन्य मानू लागले. अनेकांनी तर आता लढून उपयोग नाही या हताश भूमिकेचा स्वीकार केला तरी मराठी भाषा, मराठी अस्मिता, महाराष्ट्रप्रेम याने भारावलेल्या पिढय़ांमागून पिढय़ा संघर्ष करायच्या थांबल्या नाहीत. कर्नाटक सरकारने मराठी शाळा, मराठी ग्रंथालये, मराठी सांस्कृतिक चळवळी बंद पाडल्या. शिवरायांचे पुतळे बुलडोझर लावून दूर केले. गावांचे मराठी भाषेतील नामफलक तोडले व या अन्यायाविरुद्ध 20 लाख सीमा बांधव लढतच आहेत. एक निवडणूक हरले म्हणून लढा संपत नाही. जेथे भाषा, संस्कृती व अस्मितेचा प्रश्न येतो तेथे मराठी माणूस वाघाच्या काळजाने लढतच असतो. शिवसेनेने बेळगावच्या लढय़ासाठी 69 हुतात्म्यांची आहुती दिलीच आहे. शिवसेनाप्रमुखांनी या कार्यासाठी तीन महिन्यांचा तुरुंगवासही भोगला, म्हणूनच बेळगावातील मराठी एकजुटीच्या पराभवाने शिवसेना, महाराष्ट्राची जनता अस्वस्थ झाली आहे. शिवरायांच्या काळात सूर्याजी पिसाळ, खंडोजी खोपडे हे निपजले होतेच. औरंगजेबाने आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अटक केल्याचे वृत्त धडकताच संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात व चिंतेत बुडाला होता, पण महाराजांच्या अटकेनेही आनंद मानून, गोडधोड वाटणारा एक वर्ग तेव्हाही महाराष्ट्रात होताच. त्याच प्रवृत्तीचे लोक बेळगाव महापालिका निवडणुकीतील मराठी पराभवाचा आनंद साजरा करीत आहेत. मराठीजनांचे शाप व हुतात्म्यांचे तळतळाट त्यांना लागतील. सीमा बांधवांचा लढा सुरूच राहील, मराठी एकजूट पुन्हा उसळून समोर येईल! बेळगावच्या पराभवातून एक धडा घ्यावाच लागेल. आपले शत्रू आणि वैरी आपल्याच घरात आहेत. एकीची वज्रमूठ सुटली की गद्दारांचे फावते!




























































