सामना अग्रलेख – विषाचा प्याला!

विषारी दारूमुळे मरणारे हे लोक निर्धन परिवारातील असतात. त्यामुळे तात्कालिक पडसाद वगळता फारशी बोंब होत नाही. अधिकाधिक नफ्यासाठी दारू माफिया गावठी दारूत जीवघेणी रसायने मिसळतात. दारूच्या कमाईतून पोलीस आणि अबकारी विभागाचे संरक्षण मिळवतात आणि त्यातूनच उज्जैन व मुरैनासारख्या दारूकांडाच्या घटना घडतात. हातावर पोट असलेल्या गोरगरीबांचे प्राण वाचवायचे असतील तर मध्य प्रदेशच नव्हे, राज्याराज्यातील गावागावात खुलेआम सुरू असलेला अवैध दारू निर्मितीचा कुटिरोद्योग कठोरपणे मोडून काढावाच लागेल. अन्यथा त्या विषाचा प्याला गोरगरीबांचे जीव घेतच राहील!

विषारी दारूमुळे जाणारे बळी हा विषय आता आपल्या देशात सर्वांच्या सवयीचा झाला आहे. राज्यकर्ते, पोलीस प्रशासन आणि समाजासाठीही दारूबळीच्या घटना इतक्या अंगवळणी पडल्या आहेत की, अशा घटनांकडे गांभीर्याने लक्ष द्यायला आता कोणीच तयार नाही. स्वस्तातली विषारी दारू पिऊन मरणाऱया गोरगरीब माणसाच्या जिवाचे जणू काही मोलच नाही असाच समज तमाम व्यवस्थेने करून घेतलेला दिसतो. मध्य प्रदेशात तेच घडते आहे. तीन महिन्यांपूर्वी प्राचीन सांस्कृतिक नगरी असलेल्या उज्जैनमध्ये विषारी दारूने 16 मजुरांचे बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा मध्य प्रदेशात विषारी गावठी दारूने 11 जण मृत्युमुखी पडले आहेत. विषारी दारू प्राशन केलेल्या अनेक जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. दारूकांडाची ताजी घटना मुरैना जिह्यातील आहे. मुरैनालगतच्या दोन गावांतील काही लोकांनी एकत्रितपणे नशापाणी केले आणि त्यानंतर काही तासांतच दारूतील विष शरीरात पसरून त्यांची तडफड सुरू झाली. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली तेथील पोलीस अधिकाऱयाला आता निलंबित करण्यात आले आहे. पाठोपाठ दारूच्या अड्डय़ांवर धाडसत्र आणि अटकसत्र ही नेहमीची कवायतही सुरू झाली आहे. अशा घटना घडल्यानंतर दारू माफियांविरुद्ध

एखादी तिखट प्रतिक्रिया

द्यायची, मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर करायची आणि एखादी सांत्वनपर भेट हा राज्यकर्त्यांचा ठरलेला शिरस्ता असतो. आताही यापेक्षा वेगळे काही घडणार नाही. मजुराचा का असेना, पण ज्या घरातील कर्ता आणि कमावता माणूस मृत्युमुखी पडतो, त्याचे कुटुंब कायमचे उघडय़ावर पडते. पुन्हा ‘दारू पिऊन तर गेला’ ही हेटाळणी सोसावी लागते ती वेगळीच. सरकारने देऊ केलेली तुटपुंजी मदत वर्षभरात संपते आणि पुढे त्या कुटुंबाची फरफट सुरू होते. स्वस्तातली गावठी दारू बनविणारे माफिया आणि त्यांना संरक्षण देणारे प्रशासन यांची मिली भगत पुन्हा एखादे दारूकांड घडवून गोरगरीबांचे संसार उद्ध्वस्त करते. हा सिलसिला वर्षानुवर्षे कधी या तर कधी त्या राज्यात असाच सुरू आहे. ऑक्टोबर महिन्यात उज्जैनमध्ये विषारी दारूने 16 जणांचे बळी घेतल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर तमाम वरिष्ठ अधिकारी उज्जैनला पोहोचले. शंभरेक दारू माफियांवर गुन्हे दाखल झाले. ‘‘अवैधपणे दारू बनवणाऱया माफियांचा थरकाप उडेल’’ अशी शिक्षा देऊ अशी गर्जना मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी उज्जैनच्या दारूकांडानंतर केली होती. मात्र ती केवळ वल्गनाच होती हे मुरैनाच्या दारूबळींनी सिद्ध केले. स्पिरिटमध्ये पाणी मिसळून

स्वस्तातली दारू

बनवायची आणि घातक रसायने असलेली ही विषारी दारू 20-25 रुपयांत विकून पाण्याचा पैसा बनवायचा हा गोरखधंदा ग्रामीण भागात वर्षानुवर्षे राजरोसपणे सुरू आहे. ज्या दिवशी दारूतील घटकांचे प्रमाण मागेपुढे होते, त्या दिवशी गोरगरीबांच्या घशात विषाचा प्याला उतरतो आणि काही तासांत मृत्यूचे तांडव सुरू होते. दोन वर्षांपूर्वी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये विषारी दारूने असाच हाहाकार उडवला. 125 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले. आसाममध्येदेखील गावठी दारूने 99 बळी घेतले होते. अलीकडे ऑगस्ट महिन्यात पंजाबमध्येही विषारी दारूने सुमारे 100 जणांचे बळी गेले. विषारी दारूमुळे मरणारे हे लोक निर्धन परिवारातील असतात. त्यामुळे तात्कालिक पडसाद वगळता फारशी बोंब होत नाही. अधिकाधिक नफ्यासाठी दारू माफिया गावठी दारूत जीवघेणी रसायने मिसळतात. दारूच्या कमाईतून पोलीस आणि अबकारी विभागाचे संरक्षण मिळवतात आणि त्यातूनच उज्जैन व मुरैनासारख्या दारूकांडाच्या घटना घडतात. लागोपाठ घडलेल्या दारूबळींच्या दोन घटनांमुळे मध्य प्रदेशची ओळख आता ‘मद्य-प्रदेश’ अशी होते आहे. हातावर पोट असलेल्या गोरगरीबांचे प्राण वाचवायचे असतील तर मध्य प्रदेशच नव्हे, राज्याराज्यातील गावागावात खुलेआम सुरू असलेला अवैध दारू निर्मितीचा कुटिरोद्योग कठोरपणे मोडून काढावाच लागेल. अन्यथा त्या विषाचा प्याला गोरगरीबांचे जीव घेतच राहील!

आपली प्रतिक्रिया द्या