
‘कश्मीर खोऱ्यातील लोक रक्ताळलेले आहेत. त्यांना पाकिस्तान राजनैतिक आणि नैतिक पाठिंबा देईल, तसेच हा मुद्दा प्रत्येक जागतिक व्यासपीठावर उपस्थित करू’, असे तारे पाकिस्तानचे नवीन पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी तोडले आहेत. हिंदुस्थानने 370 कलम हटविले तेव्हा माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पुरेसे गंभीर राजनैतिक प्रयत्न केले नाहीत, असाही ठपका शाहबाज यांनी ठेवला आहे. कश्मीर प्रश्नावर पाकिस्तानचे नवे सरकार अधिक आक्रमक असणार, याचेच हे संकेत आहेत. मोठय़ा शरीफांच्या वेळी ‘बर्थडे डिप्लोमसी’चा धक्का वगैरे देणारे आता या छोटय़ा शरीफांच्या मुक्ताफळांबाबत कोणती ‘डिप्लोमसी’ अवलंबणार आहेत?
पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनीही प्रथा-परंपरेनुसार ‘कश्मिरी राग’ आळवला आहे. नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यांच्या पहिल्याच भाषणात 370 कलम रद्द केल्याचा उल्लेख केला. शिवाय हा मुद्दा प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उपस्थित करू, अशी गरळही ओकली. पाकिस्तानी राज्यकर्ते असोत की लष्करशहा, त्यांची कश्मीरबाबतची आजवरची भूमिका हीच राहिली आहे. त्यामुळे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ आपल्या पूर्वसुरींपेक्षा वेगळे सूर काढतील, अशी अपेक्षा चुकीचीच ठरेल. किंबहुना, शाहबाजमियांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतरच्या पहिल्याच भाषणात कश्मीरचा उल्लेख केला नसता तर तेथील विरोधकांनी, लष्कराने, मुल्ला-मौलवींनी त्यांना कदाचित जाब विचारला असता. पाकिस्तानी लष्कर काय किंवा राज्यकर्ते काय, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, ‘कश्मीर प्रश्न’ हा त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा मुद्दा आहे. त्याशिवाय त्यांचा गाडा ते चालवू शकत नाहीत. त्यामुळे प्रत्येक पाकिस्तानी पंतप्रधान सत्तेत आल्यावर कश्मीर प्रश्नाची बांग देतोच देतो. इतर वेळीही अधूनमधून त्यांना कश्मीरची उचकी लागतच असते. पाकिस्तान निर्माण झाला तेव्हापासून
कश्मीरचा घास
हे पाकिस्तानी राज्यकर्त्यांचे ‘स्वप्न’ राहिले आहे. त्याच्या पूर्ततेसाठी हिंदुस्थानविरुद्ध कधी उघड तर कधी छुपे युद्ध पाकडे नेहमीच करीत आले आहेत. दहशतवादी कारवाया घडवून कश्मीर खोरे दशकानुदशके अशांत आणि अस्थिर ठेवणारे पाकडेच आहेत. आजवर तेथे हजारो स्थानिक कश्मिरी दहशतवाद्यांच्या गोळय़ांना बळी पडले आहेत. त्यात कश्मिरी पंडित जसे आहेत तसे स्थानिक मुस्लिमदेखील आहेत. त्याशिवाय दहशतवाद्यांच्या हल्ल्यांत आपल्या शेकडो जवानांचे बलिदान झाले आहे ते वेगळेच. 370 कलम हटवूनही या परिस्थितीत फार फरक पडलेला नाही. पुन्हा या दहशतवाद्यांना पाकडे राज्यकर्ते उघडपणे ‘शहीद’ म्हणत असतात. त्यात कारगील घडविणारे परवेझ मुशर्रफ जसे होते तसे आता अविश्वास ठरावामुळे पायउतार होण्याची नामुष्की ओढवून घेतलेले मियां इम्रानदेखील होते. पंतप्रधान मोदी यांनी ज्या नवाज शरीफ यांना अचानक लाहोरला उतरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या त्या नवाज शरीफ यांचेही कश्मीरबाबतचे धोरण वेगळे नव्हतेच. किंबहुना, मोदी यांच्या या कथित
बर्थडे डिप्लोमसीनंतर
थोडय़ाच दिवसांत कश्मीरमधील उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपले 18 जवान शहीद झाले होते. आता त्याच नवाज शरीफ यांचे लहान भाऊ शाहबाज पाकिस्तानचे पंतप्रधान झाले आहेत आणि त्यांनी पहिल्याच भाषणात कश्मीरचा मुद्दा उकरून काढत भविष्यातील धोरणांची जाणीव करून दिली आहे. एकीकडे हिंदुस्थानसोबत चांगले संबंध हवे आहेत असे म्हणायचे आणि दुसरीकडे कश्मीर प्रश्नावर गरळही ओकायची. 370 कलमाचा उल्लेख करताना चिथवणीखोर भाषा करायची. ‘कश्मीर खोऱ्यातील लोक रक्ताळलेले आहेत. त्यांना पाकिस्तान राजनैतिक आणि नैतिक पाठिंबा देईल, तसेच हा मुद्दा प्रत्येक जागतिक व्यासपीठावर उपस्थित करू’, असे तारे पाकिस्तानचे नवीन पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी तोडले आहेत. हिंदुस्थानने 370 कलम हटविले तेव्हा माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पुरेसे गंभीर राजनैतिक प्रयत्न केले नाहीत, असाही ठपका शाहबाज यांनी ठेवला आहे. कश्मीर प्रश्नावर पाकिस्तानचे नवे सरकार अधिक आक्रमक असणार, याचेच हे संकेत आहेत. मोठय़ा शरीफांच्या वेळी ‘बर्थडे डिप्लोमसी’चा धक्का वगैरे देणारे आता या छोटय़ा शरीफांच्या मुक्ताफळांबाबत कोणती ‘डिप्लोमसी’ अवलंबणार आहेत?


























































