आजचा अग्रलेख : तडाखेबंद सुषमा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

त्याग, संघर्ष व संयमाचा मिलाफ म्हणजे सुषमा स्वराज. संपूर्ण जीवनभर त्यांनी ही त्रिसूत्री सांभाळली. राज्यकर्ते आपल्या हाती असलेल्या सत्तेचा किती बेदरकार वापर करतात याची निर्लज्ज उदाहरणे नेहमीच घडत असतात. लोकशाहीतील दोषांसंबंधी आवाज उठविणे हाच लोकशाही वाचविण्याचा एकमेव मार्ग आहे. सुषमा स्वराज यांचा आवाज त्या अर्थाने नेहमीच बुलंद राहिला. ‘युनो’त त्या परराष्ट्रमंत्री म्हणून गेल्या. त्यांनी तडाखेबंद हिंदीत भाषण केले व संपूर्ण जगासमोर पाकच्या दहशतवादी चेहऱ्यावरचा मुखवटा फाडला. सुषमा स्वराज हे नाव देशवासीयांच्या मनावर कायमचे कोरले गेले आहे. त्यांना आमची विनम्र श्रद्धांजली!

राजकारणाच्या दगाबाज क्षेत्रातही ज्यांनी नैतिकतेचा, मांगल्याचा नंदादीप तेवत ठेवला अशा सुषमा स्वराज आपल्यातून निघून गेल्या आहेत. राजकारण, प्रशासन आणि सार्वजनिक जीवनातील नीतिमत्ता यासंबंधी आस्था असणाऱ्या प्रत्येकाने श्रीमती स्वराज यांचे जीवन व तपस्या यापासून प्रेरणा घेतली पाहिजे. सुषमा स्वराज या फक्त नेत्या नव्हत्या, देशाच्या राजकारणातील एक झळाळता अध्याय होता. देशाच्या संसदेत 370 कलमावर चर्चा होत असताना आणि हे देशविरोधी कलम गाडले जात असताना सुषमा स्वराज यांनी अखेरचा श्वास घेतला. लोकसभेत 370 कलम नष्ट झाल्याची मोहर उठताच सुषमा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद दिले. संपूर्ण जीवनभर मी याच दिवसाची प्रतीक्षा करीत होते असे ‘ट्विट’ त्यांनी केले आणि त्यांची प्राणज्योत मालवली. जम्मू-कश्मीर खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालेले त्यांनी पाहिले व अखेरच्या प्रवासाला निघाल्या. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जम्मू-कश्मीरसाठी बलिदान दिले. सुषमा स्वराज यांनी त्यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासात 370 कलम हटविण्यासाठी लढा दिला व ते स्वप्न पूर्ण होताच श्यामाप्रसाद यांना भेटण्यासाठी स्वर्गस्थ झाल्या. त्याग, संघर्ष व संयमाचा मिलाफ म्हणजे सुषमा स्वराज. संपूर्ण जीवनभर त्यांनी ही त्रिसूत्री सांभाळली. मृत्यू सांगून येत नाही हे खरेच, पण जे स्वप्न राष्ट्रासंदर्भात पाहिले ते पूर्ण होईपर्यंत मृत्यू स्वराज यांच्यासाठी थांबला हा कोणता दैवयोग म्हणावा! देशाच्या राजकारणातील एक गौरवशाली अध्याय संपल्याची वेदना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली. संपूर्ण देशाची तीच भावना आहे. विश्वास आणि सचोटीचे दुसरे नाव सुषमा स्वराज. त्या बोलायला उभ्या राहिल्या किंवा टी.व्ही. वाहिन्यांवर बोलताना पाहिले की वाटत असे, कुणी आपल्या घरातलीच व्यक्ती बोलतेय, आपल्या मनातले बोलतेय. स्वराज यांची राजकीय कारकीर्द प्रदीर्घ राहिली. 41 वर्षांचा हा त्यांचा प्रवास. तीन वेळा विधानसभा, चार वेळा लोकसभा, तीन वेळा राज्यसभेच्या सदस्या म्हणून त्या निवडून आल्या. लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या म्हणून त्यांनी प्रभुत्व गाजवले. राजकीय पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील पहिल्या महिला प्रवक्त्या म्हणूनही सुषमा स्वराज यांची नोंद कायम राहील. 2014 साली त्या मोदी मंत्रिमंडळात परराष्ट्रमंत्री झाल्या. जगभरातल्या हिंदुस्थानींशी समाज माध्यमांतून संवाद साधणाऱ्या इतक्या

दिलखुलास परराष्ट्रमंत्री

गेल्या सत्तर वर्षांत झाल्या नसतील. परराष्ट्रमंत्री म्हणजे फक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन देशाची भूमिका मांडणारा नेता ही प्रतिमा स्वराज यांनी साफ पुसून टाकली. जगभरात अडकलेल्या, संकटात सापडलेल्या प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकाच्या मदतीसाठी त्या धावून गेल्या. फक्त एका ट्विटच्या माध्यमातून सीमेपलीकडे अडकलेल्या हिंदुस्थानी जनतेच्या संरक्षक बनल्या. युद्धग्रस्त येमेन देशात अडकलेल्या चार हजारांपेक्षा जास्त हिंदुस्थानी नागरिकांची सुटका त्यांनी धाडसाने केली. एवढेच नव्हे तर त्या ठिकाणी अडकलेल्या अन्य 48 देशांच्या सुमारे दोन हजार नागरिकांचीही त्यांनी राबविलेल्या ‘ऑपरेशन राहत’मध्ये सुखरूप सुटका झाली. दक्षिण सुदानमधील यादवी युद्धात फसलेल्या हिंदुस्थानी नागरिकांच्या सुटकेसाठीही सुषमा स्वराज यांनी ‘ऑपरेशन संकटमोचन’ यशस्वीपणे राबवले. येमेन आणि सुदानमध्ये फसलेल्या हिंदुस्थानींसाठी जणू त्या ‘राहत’ आणि ‘संकटमोचक’च बनल्या होत्या. पाकिस्तानच्या दलदलीत फसलेल्या मूकबधिर गीताला त्यांनी सुरक्षित आणले. पाकिस्तान दुश्मन राष्ट्र असले तरी तेथील आजारी लोकांना हिंदुस्थानात उपचारांसाठी येण्यासाठी तत्काळ मेडिकल व्हिजा देण्यास त्यांनी मान्यता दिली. पाकिस्तानातील अनेकांनी स्वराज यांचा उल्लेख ‘हिंदुस्थानातील आपली दुसरी आई’ असा केला. एका मोकळय़ा मनाची व माणुसकीने ओथंबून वाहणाऱ्या नेतृत्वाची ती जिवंत प्रतिमा होती. 1977 साली विद्यार्थी चळवळीतून त्या राजकारणात आल्या. आणीबाणीविरोधी लढय़ात त्या सक्रिय राहिल्या. जयप्रकाश नारायण यांच्या दुसऱ्या क्रांतीचा नारा ज्या तरुण कार्यकर्त्यांनी पुढे नेला त्यात सुषमा स्वराज यांचे नाव आघाडीवर राहील. इंदिरा गांधी यांच्या हुकूमशाहीविरुद्ध त्या रस्त्यावर उतरल्या. संघर्ष करण्याची तयारी, प्रखर राष्ट्रभक्ती, बेमिसाल भाषण शैली, हिंदी इतकेच इंग्रजीवर प्रभुत्व, देशातील अनेक भाषांतून संवाद साधण्याचे कौशल्य यामुळे देशातील सर्वच प्रांतांत त्या लोकप्रिय ठरल्या. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी 1970 मध्ये त्या हरयाणा विधानसभेत निवडून आल्या. देवीलाल सरकारमध्ये त्या देशातील सगळय़ात कमी वयाच्या कॅबिनेट मंत्री झाल्या. जनता पक्ष ते भारतीय जनता पक्षाच्या

सर्वोच्च नेत्या

असा त्यांचा प्रवास चमकदार होता. राज्यकर्ते आपल्या हाती असलेल्या सत्तेचा किती बेदरकार वापर करतात याची निर्लज्ज उदाहरणे नेहमीच घडत असतात. लोकशाहीतील दोषांसंबंधी आवाज उठविणे हाच लोकशाही वाचविण्याचा एकमेव मार्ग आहे. सुषमा स्वराज यांचा आवाज त्या अर्थाने नेहमीच बुलंद राहिला. राजकारणात त्या फायद्यासाठी आल्या नाहीत. राष्ट्र आणि समाजाच्या जबाबदारीचे भान ठेवून त्या आल्या. मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना श्रीमती स्वराज लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या होत्या. यूपीए सरकारच्या काळातील भ्रष्टाचाराच्या त्यांनी सभागृहात आणि बाहेर चिंधडय़ा उडवल्या. भ्रष्टाचारावर सारवासारव करणाऱ्या सरकारचे त्यांनी वाभाडे काढले. ‘युनो’त त्या परराष्ट्रमंत्री म्हणून गेल्या. त्यांनी तडाखेबंद हिंदीत भाषण केले व संपूर्ण जगासमोर पाकच्या दहशतवादी चेहऱ्यावरचा मुखवटा फाडला. 29 सप्टेंबर 2018 ला सुषमा यांनी केलेले भाषण गाजले. त्याच भाषणात त्यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले होते. ‘पाकिस्तान हा देश नसून दहशतवादाची फॅक्टरी आहे’ असे सांगून युनोत खळबळ उडवली. सुषमा या लोकप्रिय नेत्या होत्या, पण स्वस्त प्रसिद्धीच्या मागे त्या लागल्या नाहीत. त्यांचा पेहराव, त्यांचे वर्तन, त्यांचा व्यवहार शालीन व सुसंस्कृत होता. एका अखंड सौभाग्यवतीचे त्यांचे जगणे होते. त्यांच्या कपाळावरील भव्य कुंकू हीच त्यांची ओळख होती. त्या एक यशस्वी नेत्या व सफल गृहिणी होत्या. उदारता हा त्यांचा स्वभाव होता, पण अन्यायाविरुद्ध लढताना त्यांनी अनेकदा चंडिकेचे रूप धारण केले. नोव्हेंबर 2016 साली त्या किडनीच्या विकाराने आजारी पडल्या. किडनी ट्रान्सप्लांटची यशस्वी शस्त्र्ाक्रिया पार पडली. त्यानंतर त्या पुन्हा सक्रिय झाल्या, पण 2019 ची निवडणूक लढणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. निवडणूक लढणार नाही व आता कोणतीही जबाबदारी नको, असे त्यांनी ठरवले. त्यांना कुटुंबात रमायचे होते. त्याआधीच त्या निघून गेल्या. राजकारणात 41 वर्षे त्या प्रतिष्ठsने वावरल्या व शेवटी सन्मानाने निघून गेल्या. राजकारणातील पुण्यश्लोक अहिल्येचे हे प्रयाण आहे. त्या कृष्णभक्त होत्या. तो सगळय़ांचेच बरे करील अशी त्यांची श्रद्धा होती. दिल्लीतील नव्या राजवटीत त्यांनी पाच वर्षे काढली. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी कायमचा निरोप घेतला. सुषमा स्वराज हे नाव देशवासीयांच्या मनावर कायमचे कोरले गेले आहे. त्यांना आमची विनम्र श्रद्धांजली!