सामना अग्रलेख – पाऊस येणार धावून!

स्कायमेटने व्यक्त केलेला उत्तम पर्जन्यमानाचा अंदाज नक्कीच दिलासादायक आहे. कोरोनाच्या संकटकाळात गेल्या दीडेक वर्षामध्ये हजारो कारखाने बंद पडलेअर्थचक्राचा गाडा रुतला. मात्र, गतवर्षी झालेल्या चांगल्या पावसाने कृषिमालाचे उत्पन्न वाढून हेलकावे खाणाऱया अर्थव्यवस्थेला संजीवनी देण्याचे काम केले होते. यंदाही पाऊस असाच मदतीला धावून येणार असेल तर त्यासाठी निसर्गाचे आभारच मानले पाहिजेत!

जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोनामुळे सगळीकडेच एक नकारात्मक वातावरण निर्माण झाले असतानाच काहीशी उभारी किंवा दिलासा देणारी सकारात्मक बातमी समोर आली आहे. दीड महिन्यावर येऊन ठेपलेला यंदाचा पावसाळा समाधानकारक असेल, असे शुभवर्तमान जाहीर झाले आहे. अंगाची काहिली करणाऱया उष्णतेच्या लाटेत गार वाऱयाची झुळुक यावी, अशी ही बातमी आहे. हवामानाचा अंदाज व्यक्त करणाऱया ‘स्कायमेट’ या नामांकित संस्थेने ही आनंददायक बातमी जाहीर केली आहे. ‘स्कायमेट’ने जाहीर केलेल्या तपशिलानुसार यंदा 103 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. 96 ते 104 टक्क्यांच्या आसपास जर पाऊस होणार असेल तर अभ्यासकांच्या मते हे पर्जन्यमान समाधानकारक मानले जाते. 2019 आणि 2020 या मागच्या सलग दोन वर्षांतही हे प्रमाण अनुक्रमे 110 आणि 109 टक्के म्हणजेच समाधानकारकच होते. अर्थात या लागोपाठ दोन वर्षांत पाऊसही तसा चांगलाच झाला. हवामान खात्याच्या एकूणच यंत्रणेत अलीकडच्या काळात झालेले क्रांतिकारक बदल, उपग्रहांच्या माध्यमातून घेतले जाणारे अचूक वेध व हवामानाची एकूण परिस्थिती आणि विश्लेषणात्मक अभ्यास यासाठी वापरली जाणारी अत्याधुनिक संगणक प्रणाली यामुळे

हवामानाचे बहुतांश अंदाज

थोडय़ाफार फरकाने खरे ठरत आहेत, हे नाकारता येणार नाही. हवामान खात्याचे अंदाज म्हणजे पूर्वी चेष्टेचा विषय असायचा. तशी परिस्थिती आता नक्कीच राहिली नाही. त्यामुळे मागच्या दोन वर्षांत जसे पावसाचे अंदाज खरे ठरले तसाच यंदाचा 103 टक्के पावसाचा अंदाजही खरा ठरेल. ‘स्कायमेट’च्या अंदाजानुसार सालाबादाप्रमाणे दक्षिण-पश्चिम अर्थात नैऋत्येकडून हिंदुस्थानात सक्रिय होणारा मान्सून यंदा सरासरीपेक्षाही अधिक कोसळण्याची शक्यता आहे. देशातील 75 टक्के भागामध्ये जून ते सप्टेंबर या पावसाळ्य़ाच्या चारही महिन्यांत उत्तम पर्जन्यमान होईल. यात आणखी आनंदाची गोष्ट अशी की, गतवर्षी ज्या राज्यांमध्ये आणि विभागांमध्ये तुलनेने कमी पाऊस झाला होता, त्या ठिकाणी यंदा चांगल्या पावसाची शक्यता आहे. जूनमध्ये बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये चांगला पाऊस पडेल तर जुलैमध्ये महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यांत जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता आहे. पूर्वोत्तर अर्थात ईशान्येकडील राज्ये आणि कर्नाटक, गुजरात व महाराष्ट्राच्या काही भागांत मात्र पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील कोणत्या भूभागात पाऊस कमी असेल याचा नेमका तपशील समोर आलेला नसला, तरी परंपरेने मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील नेहमीच्याच

कमी पर्जन्यमान असलेल्या

काही जिह्यांचा यात समावेश असू शकतो. प्रशासनाने आधीच सतर्क राहून कमी पावसाच्या क्षेत्रातील पाण्याची उपलब्धता, पिकांची निवड याचे बारकाईने नियोजन करून त्या दृष्टीने शेतकऱयांचेही नीट प्रबोधन करायला हवे. असे नियोजन आपण करणार नसू तर हवामानाच्या पूर्वानुमानाचा अभ्यास करणे आणि अंदाज व्यक्त करणे याला काही अर्थ उरणार नाही. बाकी उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड वगैरे राज्यांत सरासरीपेक्षाही अधिक पाऊस कोसळेल, असे ‘स्कायमेट’ने म्हटले आहे. गेल्या काही वर्षांत परतीचा पाऊस पावसाळा संपल्यानंतरही रेंगाळतो आणि जाता जाता धो धो कोसळतो, असे वारंवार घडते आहे. यंदाही परतीचा पाऊस नेहमीपेक्षा अधिक असण्याचा अंदाज आहे. सप्टेंबरमध्ये सर्वसाधारणपणे 170 मि.मी. पावसाची नोंद होते ती यावेळी 197 मि.मी. असेल, असा कयास आहे. ‘स्कायमेट’ने व्यक्त केलेला उत्तम पर्जन्यमानाचा अंदाज नक्कीच दिलासादायक आहे. कोरोनाच्या संकटकाळात गेल्या दीडेक वर्षामध्ये हजारो कारखाने बंद पडले, अर्थचक्राचा गाडा रुतला. मात्र, गतवर्षी झालेल्या चांगल्या पावसाने कृषिमालाचे उत्पन्न वाढून हेलकावे खाणाऱया अर्थव्यवस्थेला संजीवनी देण्याचे काम केले होते. यंदाही पाऊस असाच मदतीला धावून येणार असेल तर त्यासाठी निसर्गाचे आभारच मानले पाहिजेत!

आपली प्रतिक्रिया द्या