देवाच्या भावमुद्रेतच सारे सामावलेय…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मूर्तिमंत रूपाचा उद्घाटन सोहळा बुधवारी वानखेडेवर रंगला आणि आज तमाम मुंबईकरांनी सॉरी, विजय मर्चंट आणि सचिन तेंडुलकर स्टॅण्डमध्ये बसलेल्या प्रेक्षकांनी सचिनचे मूर्तिमंत रूप पाहून त्याला मानवंदनाही दिली. या पूर्णाकृती पुतळय़ाच्या चेहऱयावरून काही मजेशीर किस्से सोशल मीडियावरही क्षणात पसरले. पुतळय़ाचा चेहरा ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथसारखा दिसत असल्यासारखे बोलले जात होते. पण क्रिकेटच्या देवाची अनेक रूपे आहेत. देवाच्या भावमुद्रेत आणि शैलीमध्येच सारे सामावलेले असते. सचिनसारखी मुद्रा, पोझ कुणाची असूच शकत नाही. या मुद्रेवरूनच आमचा देव ओळखला जाणार, अशी भावना मुंबईकरांनी व्यक्त केली.

बुधवारी वानखेडेवर क्रिकेटच्या देवाचा पूर्णाकृती पुतळा उभारला गेला. पुतळय़ाचे प्रथम दर्शन होताच अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या. काहींना तो पुतळा सचिनचाच वाटला तर काहींना स्टीव्ह स्मिथसारखा भासू लागला. त्यामुळे लोकांनी मजेशीर किस्से शेअर करताना स्मिथच्या सर्वोत्तम सरासरीमुळे आयसीसीने त्याचा पुतळा उभारल्याचे सांगितले, तर काहींनी पुतळय़ासाठी स्टीव्ह स्मिथचेही अभिनंदन केले. मात्र हिंदुस्थानी चाहत्यांनी अशा मजेशीर कमेंट्सची उलटतपासणी करताना ते म्हणाले, जशी देवाची अनेक रूपे असतात तरी आपण देवांना न चुकता ओळखतो. कारण प्रत्येक देवाची एक शैली असते, एक भावमुद्रा असते. तशीच या क्रिकेटच्या देवाची भावमुद्रा आहे. उत्तुंग षटकार मारण्यासाठी पुढे सरसावलेला सचिन हा कुणीही ओळखू शकतो. शिल्प कधीही हुबेहूब होत नाहीत. प्रत्येक शिल्प हे एकमेकांपासून किंचित वेगळेच असतात. त्यामुळे सचिनच्या पुतळा रूपाबद्दल जे प्रतिक्रिया देत आहेत ते निव्वळ मूर्ख असल्याची बोलकी प्रतिक्रिया हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींनी दिली.

शतकांच्या राजाची मानवंदना हुकली
‘शतकांचा राजा’ असलेल्या सचिन तेंडुलकरच्या पूर्णाकृती पुतळय़ाला आज शतकाने मानवंदना दिली जाईल अशी सर्वांची अपेक्षा होती. विराट कोहलीची फलंदाजी पाहता तोच सचिनच्या 49 एकदिवसीय शतकांची बरोबरी साधत तो सचिनच्या पुतळय़ाला अनोखी मानवंदना देईल, अशी अपेक्षा होती. पण तो 88 धावांवर बाद झाला. त्याधी शुबमन गिलचे शतक 8 धावांनी हुकले तर शतकाच्या दिशेने सुस्साट वेगाने जात असलेला मुंबईकर श्रेयस अय्यरही 82 धावांवर बाद झाला आणि सचिनची मानवंदना लांबणीवर पडली.