गुरुव्दारा बोर्ड निवडणूक ६० टक्के मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

सचखंड गुरुव्दारा बोर्डाच्या निवडणुकीसाठी नांदेड शहरातील १५ मतदान केंद्रावर ६० टक्के मतदान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.

या निवडणुकीत तीन जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात आहेत. ३१ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनमध्ये मतमोजणी सकाळी ११ वाजता सुरु होणार आहे. मतदान बॅलेट पेपरने झाले असल्यामुळे मतमोजणीस उशिर लागेल, असा अंदाज आहे.

सचखंड गुरुव्दारा बोर्डाच्या कार्यक्षेत्रात एकूण १२ हजार ७१४ मतदार आहेत. यापैकी सर्वाधिक ८ हजार २०० मतदार नांदेडमध्ये आहेत. बोर्डाचे कार्यक्षेत्र मराठवाड्यातील आठ जिल्हे आणि विदर्भातील चंद्रपूर जिल्हा असे आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे धाराशिव जिल्ह्यात फक्त चार मतदार असून, त्यांच्यासाठी स्वतंत्र मतदान केंद्र आणि मतदान कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

शुक्रवारी सकाळी ८ वाजता मतदानास सुरुवात झाली. सुरुवातीस मतदान धिम्या गतीने होत होते. परंतू सकाळी अकरानंतर मतदानास वेग आला. पोलीस बंदोबस्त चोख असल्यामुळे मतदान शांततेत पार पडले.