
कोरोनामुळे दीड वर्ष सर्वसामान्य नागरिकांना कोणतेही सण आनंदाने साजरे करता आलेले नाही. सर्वसामान्य जनतेला दिवाळी सणाचा आनंद देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने ध्वज दिवाळी अभियान हाती घेतले जाणार आहे. 50 हजार घरांवर भगवे ध्वज लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तसेच विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल यांनी आज शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
शिवसेनेच्या वतीने दिवाळीनिमित्त नाविन्यपूर्ण उपक्रमाचे शहरात आयोजन करण्यात आले आहे. याबद्दलची माहिती देण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या क्रांतीचौकातील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. आमदार संजय शिरसाट म्हणाले की, कोरोना संसर्गामुळे दिड वर्ष सर्वसामान्य नागरिकांना कोणतेही सण उत्साहात साजरा करता आलेला नाही. कोरोनाने अनेक कुटुंबातील व्यक्तींना हिरावून घेतले आहे. अशा कुटुंबामध्ये दिवाळीचा गोडवा निर्माण करणे तसेच सर्वसामान्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी घर दिवाळी अभियान राबवले जाणार आहे.
- 1 ते 3 नोव्हेंबर दरम्यान ध्वज दिवाळी अभियानांतर्गत किमान 50 हजार घरांवर भगवे ध्वज लावण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे.
- 4 नोव्हेंबर रोजी दिपावलीच्या पहाटे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सकाळी 5 ते 7 या वेळेत अभ्यंगस्नान घातले जाईल. त्याकरिता शिवसेनेच्या वतीने गरम पाणी, उटणे, साबण देण्यात येईल.
- 5 नोव्हेंबर रोजी शिवसेना ठिकठिकाणी आकाश दिव्याच्या धर्तीवर विकास दिप लावण्यात येतील. चौकाचौकात होत असलेल्या व होणाऱ्या विकासाबाबतीत उद्घोषित असतील असे 200 विकास दिप ठिकठिकाणी लावण्यात येतील.
- 6 आणि 7 नोव्हेंबर रोजी महिला आघाडीच्या वतीने भाऊबीज साजरी केली जाणार आहे. कोरोना योद्धया सोबत त्यात वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय सहाय्यक (कंपाऊंडर) यांना भेट वस्तू देऊन ओवाळले जाईल. त्याच बरोबर 7 नोव्हेंबर रोजी शहरातील 33 स्मशानभुमीमध्ये अविरत सेवा देणारे स्मशानजोगी व त्यांच्या कुटुंबीयांसोबत भाऊबीज करून त्यांना भेटवस्तू व साडीचोळी कपडे भेट देण्यात येणार आहे.
- 7 नोव्हेंबर रोजी बीडबायपास फटाका मार्केट, टि व्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराज मैदान, नारळीबाग, पावण गणपती मंदिर परिसर, या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणारी किल्ले बनवा स्पर्धा होणार आहे.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या माध्यमातून 14 नोव्हेंबर रोजी तापडीया नाटयमंदिर येथे मी सावरकर बोलतोय या नाटकाचा प्रयोग होणार आहे. तसेच जुने व जेष्ठ शिवसैनिकांचा सत्कार आणि श्रीधर फडके यांचे गीत रामायण हा कार्यक्रम घेतला जाणार आहे. या पत्रकार परिषदेला माजी महापौर नंदकुमार घोडेले, महिला आघाडीच्या संपर्क संघटक सुनीता आऊलवार, जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, पूर्व विधानसभा संघटक राजू वैद्य, माजी महापौर विकास जैन, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, बाबासाहेब डांगे, राजू वरकड आदींची उपस्थिती होती.



























































