
सामना प्रतिनिधी । अलिबाग
जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यालगत असलेल्या परिसरात सागरी सुरक्षा कवच प्रात्यक्षिक जिल्हा पोलीस दलाकडून मंगळपासून सुरू झाले आहे. सागरी सुरक्षा कवच प्रात्यक्षिकांमध्ये समुद्र किनारी, शहरातील मुख्य नाका तसेच समुद्रात पोलिसांकडून गस्त पहारा देण्यात आला आहे. यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने वाहनाची तपासणी पोलीस कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.
जिल्ह्याला 240 किमीचा सागरी किनारा लाभला असून त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा पोलीस दलाकडून सागरी सुरक्षा कवच प्रात्यक्षिक मंगळवार, बुधवार असे दोन दिवस राबविण्यात येत आहे. सागरी सुरक्षा कवचमध्ये 70 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी तर 500 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक या प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर कोस्ट गार्ड, सागरी पोलिसही गस्त करीत आहेत. सागरी किनाऱ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने सागरी सुरक्षा कवच प्रात्यक्षिक सुरू आहे. सागरी किनाऱ्यावरून तसेच समुद्रातून दहशतवादी कारवाया तसेच किनारी रस्त्यावरून अवैध धंद्याची वाहतूक बऱ्याच वेळेला होत असते. याच दृष्टीने अशा होणाऱ्या कारवायांना आळा बसण्यासाठी तसेच पोलीस यंत्रणा किती सतर्क आहे याचा आढावा घेणे, हा या सागरी सुरक्षा कवच मागचा उद्देश आहे. समुद्रातही कोस्ट गार्ड, सागरी पोलीस यांचीही सुरक्षा गस्त ठेवण्यात आलेली आहे. तर जिल्ह्यातील सागरी किनारी भागातील परिसरात नाक्यानाक्यावर पोलीस तैनात केले आहेत.

























































