जवान आता परस्परांशी बिनधास्त चॅट करणार, लष्कराचे स्वत:चे, सुरक्षित मेसेजिंग अॅप

हिंदुस्थानी लष्कराने ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेंतर्गत स्वतŠचे मेसेजिंग अॅप तयार केले आहे. सिक्योर अॅप्लीकेशन फॉर द इंटरनेट अर्थात साई असे या अॅपचे नाव आहे. हे अॅप व्हॉट्सअॅपसारखेच आहे, मात्र त्याहीपेक्षा अधिक सुरक्षित आहे. त्यामुळे लष्कर अधिकारी व जवान आता परस्परांमध्ये बिनधास्त चॅट करू शकणार आहेत. संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी या वैशिष्टय़पूर्ण अॅपची घोषणा केली.

अॅपवर टेक्स्ट मेसेजबरोबरच व्हॉईस व व्हिडिओ कॉल्सही करता येणार आहेत. कम्प्युटर इमरजेंसी रिस्पॉन्स टीम ऑफ इंडियाचे ऑडिटर आणि लष्कराच्या सायबर ग्रुपने खास अँड्रॉइड युजर्ससाठी हे अॅप तयार केले आहे. अॅपचे इन्टेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स (आयपीआर) दाखल करणे व आयओएस प्लॅटफॉर्मवर काम करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. हे अॅप अद्याप गूगल प्ले स्टोरवर उपलब्ध झालेले नाही. अॅपमध्ये इन हाऊस सर्व्हरसह कोडिंगच्या सुरक्षेचे सर्व फिचर्स आहेत. अॅप बनवण्यात कर्नल शंकर साई यांचा पुढाकार असल्याने त्यांच्याच नावावरुन अॅपला ’साई’ नाव देण्यात आले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कर्नल शंकर साई यांच्या कामगिरीची प्रशंसा केली आहे.

लष्कर अधिकाऱयांचा परस्परांमधील संवाद लीक होण्याचा धोका होता. त्या पार्श्वभूमीवर लष्कराने जुलैमध्ये जवान व अधिकाऱयांना आपल्या फोनमधून फेसबुक, इन्स्टाग्रामसारखे 89 अॅप्स डिलिट करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर लष्कराने स्वतŠचेच सुरक्षित अॅप विकसित केले आहे.

‘साई’ हे व्हॉट्सअॅप, टेलीग्राम, संवाद आणि जीआयएमएस यांसारख्या व्यावसायिक अॅपसारखेच आहे. मात्र व्यावसायिक अॅपमधील चॅटिंग लीक होण्याचा धोका टळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या