
सामना प्रतिनिधी, नदर
शिर्डीतील साईबाबा मंदिर परिसरात प्रत्येक प्रवेशद्वारावर एक वर्षाच्या आतील मुला-मुलींची नोंद करून पालकांची ओळख गेटवरील रजिस्टरमध्ये करण्याचा निर्णय साईसंस्थान प्रशासनाने घेतला आहे. संस्थानात प्रवेश करण्यापूर्वी दर्शनाच्या रांगेव्यतिरिक्त इतर रांगांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. यामुळे अगोदर त्रस्त झालेल्या भाविकांना आता या नोंदणीसाठी आणखी उभे राहण्याची वेळ येणार असल्याने साईभक्तांत या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
साईमंदिराच्या जवळच गुरुस्थान नजिक एका मातेने आपले सहा महिन्यांची चिमुकली सोडून निघून गेल्याने संस्थान प्रशासनाने याबाबतीत चौकशी सुरू केली आहे. या महिलेचा शोध घेतला जात आहे. दरम्यान अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी दर्शनबारी व्यतिरिक्त साईमंदिर परिसरात प्रवेश करताना दर्शनबारी व्यतिरिक्त तीन नंबर व चार नंबर गेटने जाणाऱ्या स्थानिक व इतर भाविकांकडे असलेल्या एक वर्षाच्या आतील बालक व पालक यांच्या ओळखीसाठी गेटवरील रजिस्टर मध्ये नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक याची नोंद केली जाणार आहे. सीसीटीव्हीत येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांचे फुटेज येत असले तरी प्रत्येक भाविकांची ओळख पटणे शक्य नाही, त्यामुळे एक वर्षाच्या आतील मुला- मुलींना मंदिर परिसरात घेऊन जाताना त्यांची नोंद करणे बंधनकारक राहणार आहे.
साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक दूर अंतरावर येत असतात. तासंतास रांगेत उभे राहुन अगोदरच त्रस्त झालेल्या भाविकांना आता बालकांची नोंद करताना आणखी वेळ द्यावा लागणार आहे. याशिवाय जे भाविक दर्शनरांगेतून दर्शन न घेता केवळ मुखदर्शन करून मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत जाऊन दर्शन घेतात. त्यांनाही या नोंदणीसाठी रांग लावली लागणार असल्याने संस्थान प्रशासनाच्या या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. एखादी अपवादात्मक घटना घडली तर पुन्हा अशी घटना वारंवार घडेल असे नसते त्यामुळे असा निर्णय घेताना भाविकांच्या भावना लक्षात घेणे गरजेचे होते असे भाविकांतून बोलले जात आहे.






























































