सैनिक बँकेच्या शाखांतील रोकड, ताळेबंद बिलांची होणार तपासणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सैनिक बँकेच्या सर्व शाखांतील रोकड, ताळेबंद आणि बिलांची तपासणी होणार आहे. याबाबत अपर निबंधक शैलेश कोतमिरे यांनी तपासणी पथकाची नियुक्ती करून अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत.

पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेने प्रथेप्रमाणे यावर्षीही तीन दिवस उलटूनही 31 मार्च 2022 रोजी मागील आर्थिक वर्षाचे बँक कॅश, ताळेबंद बंद केले नसल्याने समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. 4) जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले होते. सैनिक बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी व चेअरमन अनेक वर्षे बँकेत नियमबाह्य कामकाज करत आहेत. शाखा अधिकाऱयांना हाताशी धरत कर्जदाराच्या नावे हजारो रुपये नावे टाकत ती रक्कम वसुली हेडला जमा करायची आणि त्यानंतर बोगस बिले दाखवून रक्कम हडप करायची, असा उद्योग गेली अनेक वर्षे राबवला जात आहे. अनेकवेळा तक्रारी केल्यावर सहकार खात्याने लेखापरीक्षणात ही बिले वसूल पात्र असल्याचा ठपका ठेवला असतानाही पुन्हा तोच फंडा याही वर्षी वापरण्यात आला असल्याचा आरोप राडे यांनी केला आहे.

पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेतील पारनेर, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा येथील सर्व शाखांत एकाचवेळी 31 मार्चची रोकड तपासण्यात यावी. जानेवारी ते मार्च महिन्यातील बोगस बिले तपासावीत व वार्षिक कॅश, ताळेबंद बंद करून शेरे देण्याच्या मागणीसाठी उपोषण करण्यात आले होते. या विषयांबाबत तपासणी पथकाच्या नियुक्तीचे लेखी पत्र मिळाल्याने समितीने उपोषण मागे घेण्यात आले आहे. या उपोषणात सुदर्शन बेलकर, निवृत्ती कासुटे, रतन खत्री, पुरुषोत्तम शहाणे यांनी सहभाग घेतला होता.