
काही जण कोरोना लसीबाबत अफवा पसरवत असल्याने लोकांच्या मनात लसीविषयी संभ्रम निर्माण होत आहे. मात्र कोरोना रोखण्यासाठी लस हेच सर्वात प्रभावी असल्याचे सिद्ध झालेले असल्याने प्रत्येकाने लस घ्यावी आणि देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन बॉलीवूड स्टार सलमान खान याने केले आहे. पालिकेने याबाबतचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर प्रसारित केला आहे.
गेल्या दीड वर्षापासून आपण सर्वजण कोरोनाशी लढत आहोत. कोरोनाच्या एकामागून एक लाटा येत आहेत. कोरोनावर लस प्रभावी असल्यामुळे सरकार सर्वांचे लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. असे असताना काही जण लसीकरणाबाबत अफवा पसरवत असल्याने नाहक गैरसमज पसरवला जात आहे. त्यामुळे लसीबाबत चुकीची माहिती पसरवू नका, असे आवाहनही सलमान खान याने केले आहे. ‘स्वतः लस घ्या, आपल्या कुटुंबालाही द्या आणि देश कोरोनामुक्त करण्यासाठी आपले बहुमूल्य योगदान द्या,’ असेही सलमानने म्हटले आहे. शिवाय ‘मास्क लावा, सतत हात धुवा आणि सुरक्षित अंतर राखा,’ असे आवाहनही सलमान खानने केले आहे.





























































